एका डोळ्यात हसू, दुसऱ्यात आसू
By Admin | Updated: September 21, 2015 03:56 IST2015-09-21T03:56:58+5:302015-09-21T03:56:58+5:30
रावेत, किवळे, गहुंजे व सांगवडे शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस पडल्याने पिवळ्या पडू लागलेल्या भात व भुईमूगपिकाला मोठा फायदा झाला असून

एका डोळ्यात हसू, दुसऱ्यात आसू
किवळे : रावेत, किवळे, गहुंजे व सांगवडे शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस पडल्याने पिवळ्या पडू लागलेल्या भात व भुईमूगपिकाला मोठा फायदा झाला असून, काढणीला आलेल्या कडधान्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ‘एका डोळ्यांत आसू, तर एका डोळ्यांत हसू,’ अशी अवस्था झाली आहे. मात्र, चांगला पाऊस पडल्याचा शेतकरी व नागरिकांना खूप आनंद झाला आहे.
भात व भुईमूगपिकाच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी शेतात फेरफटका मारून पावसाने भात खाचरांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. भात खाचरांचे फुटलेले व वाहून गेलेले बांध-दुरुस्तीचे काम सुरू होते. पवना नदीची पाणी पातळी शनिवारी कमी झाली. रविवारीही पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली.
बागायत क्षेत्राचे नुकसान
उर्से : मुसळधार पावसामुळे भातपिकाला मोठ्या प्रमाणात जीवदान मिळाले, तर बागायत क्षेत्राला मात्र मोठा फटका बसला आहे. रस्त्याचीही चांगलीच दुरवस्था झाली आहे. सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पावसामुळे शेताचे बांध फुटल्याने भातपिकाचे नुकसान झाले. टोमॅटो, गवार, भेंडी, दोडका, काकडी, कारली, मिरची, वांगी आदी बागायती पिकांनाही या पावसाचा चांगला फटका बसला आहे. उर्से येथील रोहिदास धामणकर यांच्या २० गुंठे क्षेत्रावरील टोमॅटोच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. जालिंधर धामणकर, रोहिदास धामणकर, देवराम कारके, ज्ञानेश्वर धामणकर, दत्तात्रय दौंड, उत्तम धामणकर, बाळासाहेब दौंड, बाळासाहेब वाळुंज, शिवाजी धामणकर आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रस्त्यांचीही अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अगोदरच दुरवस्थेत असलेले रस्ते पावसामुळे वाहून गेले आहेत. यामध्ये उर्से-बऊर रस्त्याची ही अवस्था आहे. जागोजागी रस्ता खचला असून मोऱ्या उखडून निघाल्या आहेत.
बऊर रस्त्याच्या अवस्थेमुळे बऊर, सडवली, ओझर्डे या गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. नागरिकांना विशेषत: विद्यार्थी आणि कामगार वर्गाला रस्त्यांच्या अवस्थेचा फटका बसत आहे. (वार्ताहर)