महापौरांनी नाकारला शिवसेनेचा अधिकार
By Admin | Updated: October 27, 2015 01:02 IST2015-10-27T01:02:18+5:302015-10-27T01:02:18+5:30
महापालिकेच्या मॉडेल वॉर्डामध्ये विभागवार केलेली कामे, प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक मंजूर प्रस्ताव, मॉडेल वॉर्डात कोणते वॉर्ड घेतले

महापौरांनी नाकारला शिवसेनेचा अधिकार
पिंपरी : महापालिकेच्या मॉडेल वॉर्डामध्ये विभागवार केलेली कामे, प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक मंजूर प्रस्ताव, मॉडेल वॉर्डात कोणते वॉर्ड घेतले, त्याकरिता बजेट तरतूद किती, मनपा क्षेत्रातील एलईडी आणि सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण काय, याबाबत येत्या २० नोव्हेंबरच्या सभेत शिवसेनेच्या वतीने प्रश्नोत्तरे विचारण्यासाठी महापौरांना पत्र दिले. महापौरांनी पत्र आणि प्रश्न विचारण्याचा सदस्यांचा अधिकार नाकारला असल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या वतीने महापौरांना नोटीस देण्यात येणार आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर विविध विषय चर्चेविनाच रेटून नेले जातात. तसेच सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांचे विषय टाळले जातात. महत्त्व दिले जात नाही. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी महापौर शकुंतला धराडे यांच्या नावाने पत्र तयार केले. येत्या सभेमध्ये प्रश्नोत्तरांसाठी संधी मिळावी, अशी मागणी करणारे पत्र घेऊन उबाळे महापौरांच्या कक्षात गेल्या. पत्र वाचून पाहिल्यानंतर महापौरांनी आपल्या सहायकामार्फत सत्तारूढ पक्षनेत्यांच्या कक्षात पाठविले.
काही मिनिटांनंतर महापौरांचा सहायक परत आला आणि त्याने तार्इंचा निरोप महापौरांना सांगितला. प्रश्नोत्तराचे पत्र स्वीकारू शकत नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर उबाळे यांनी महापौर ज्यांचे ऐकतात, ज्यांनी संधी दिली, त्यांना दूरध्वनी केला. मात्र, महापौरांनी भूमिका सोडली नाही. त्यानंतर उबाळे यांनी हे पत्र कार्यालयीन आवक-जावकमध्ये नोंदविले. याविषयी महापौरांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)