शिवसेना जिल्हाप्रमुख खराडे यांना अटक करा

By Admin | Updated: July 9, 2015 02:34 IST2015-07-09T02:34:07+5:302015-07-09T02:34:07+5:30

खंडणी मागून दहशत माजविण्याऱ्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांना अटक करण्याची मागणी जाहिरात व्यावसायिक सुनील दरेकर आणि स्नेहल दरेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

Shiv Sena district chief Kharade arrested | शिवसेना जिल्हाप्रमुख खराडे यांना अटक करा

शिवसेना जिल्हाप्रमुख खराडे यांना अटक करा

लोणावळा : खंडणी मागून दहशत माजविण्याऱ्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांना अटक करण्याची मागणी जाहिरात व्यावसायिक सुनील दरेकर आणि स्नेहल दरेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
खंडाळा व लोणावळा परिसरात गार्गी आऊटडोर नावाने जाहिरातीचा व्यवसाय करणारे सांताक्रुझ, मुंबई येथील व्यावसायिक दरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी खराडे यांच्यावर २१ मे रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. पण, दीड महिना झाला, तरी अद्याप खराडे यांना अटक करण्यात पोलीस चालढकल करीत असल्याने माझ्यासह कुटुंबीय व कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याने खराडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी सुनील व स्नेहल दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव, गृह अपर सचिव, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
सुनील दरेकर म्हणाले, ‘ स्थानिक पातळीवर त्रास होऊ नये याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व खंडाळ्याचे स्थानिक नेते खराडे मदत करीत होते. शासकीय परवानगी व नगर परिषद मान्यता मिळविणे ही कामे खराडे पाहत होते. चार वर्षांपासून ते माझ्याकडून दरमहा २५ हजार रुपये खंडणी मागू लागले. त्रास होऊ नये याकरिता त्यांना रक्कम खंडणीच्या रूपात देत होतो.
फेब्रुवारीत एमएसआरडीसीने रस्त्यालगतच्या माझ्या काही बोर्डची जागा ताब्यात घेतल्याने व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे मार्चपासून त्यांना २० हजार रुपये पाठविले असता, त्यांनी ते घेण्यास नकार देत मला २५ हजारच हवे असल्याचे सांगत मला व कर्मचारी विशाल खिलारे यास मारहाण केली. माझी पत्नी याचा जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेली असता, तिला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. साइटवरील माझ्या कामगारांनाही मारहाण केली. गुन्हा दाखल आहे; मात्र पोलीस अपेक्षित कारवाई करीत नाहीत. खराडे व कार्यकर्त्यांनी खंडाळा येथे दहशत माजवली असल्याने आमच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याने तातडीने खराडे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
-----------
माझ्यावर दरेकर यांनी केलेले सर्व आरोप हे खोटे व बिनबुडाचे आहेत. मी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केलेली नाही अथवा मारहाण केलेली नाही. स्थानिक राजकारणामधून आपल्यावर हे आरोप केले असून, पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तपासात सर्व गोष्टी उघड होतील. - मच्छिंद्र खराडे


आरोपींना लवकरच अटक करणार
दरेकर यांच्या फियार्दीवरून खंडाळ्यातील मच्छिंद्र खराडे व त्यांचे सहकारी नरेश गौर यांच्याविरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. खराडे व दरेकर यांच्यात फोनवरून झालेले संभाषण व मेसेज याबाबतची सर्व माहिती व पुरावे गोळा करण्यात आले असून, लवकरच खराडे यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी सांगितले. - आय.एस.पाटील

Web Title: Shiv Sena district chief Kharade arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.