सातासमुद्रापारही संगीतमय दिवाळी
By Admin | Updated: November 11, 2015 01:19 IST2015-11-11T01:19:24+5:302015-11-11T01:19:24+5:30
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कलावंतांनी भारतीय संगीताचे सूर, ताल हे सातासमुद्रापार पोहोचविले आहेत. पिंपरीतील युवा तबलावादक समीर सूर्यवंशी आणि पुण्यातील संतूरवादक

सातासमुद्रापारही संगीतमय दिवाळी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कलावंतांनी भारतीय संगीताचे सूर, ताल हे सातासमुद्रापार पोहोचविले आहेत. पिंपरीतील युवा तबलावादक समीर सूर्यवंशी आणि पुण्यातील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांची जुगलबंदी अमेरिकेतील सनहोजे येथे झाली. अमेरिकी रसिकांनी तबला आणि संतूर जुगलबंदीला उत्कट दाद दिली.
इंडियन क्लासिकल म्युझिक फाउंडेशन आॅफ आर्ट फाउंडेशनच्या वतीने कॅलिफोर्नियातील सनहोजे येथील पॅलेस आॅफ फाइन आर्ट या सभागृहात संतूर आणि तबल्याची जुगलबंदी झाली. डॉ. दैठणकर हे पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असून, सूर्यवंशी हे तबलामहर्षी अनिंदो चटर्जी यांचे शिष्य आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीत ते समन्वय आहेत. अनेक नामवंत कलावंतांना त्यांनी साथ केली आहे. सोलो तबलावादनही सादर केले आहे.
संगीत मैफलीत दैठणकर यांनी मधुवंती रागात ताल झपताल पेश केला. त्यानंतर द्रुत तीनए ताल पेश करीत रसिकांची दाद घेतली. संतूरवादनास सूर्यवंशी यांच्या बहारदार तबल्याने साथसंगत केली. त्यानंतर मिश्र शिवांजली राग वाजवून सुरेल मैफलीची सांगता झाली. सूर-तालाची मैफल रंगतदार ठरली. या वेळी संतूर आणि तबला जुगलबंदीचा अनुभव अमेरिकावासीयांनी घेतला.
या विषयी सूर्यवंशी म्हणाले, ‘‘सातासमुद्रापारही भारतीय शास्त्रीय संगीताचा रसिकवर्ग मोठा आहे. अमेरिकेतील रसिकांना भारतीय संगीताचा नजराणा सादर करण्याची संधी मला मिळाली, ही आनंदाची गोष्ट होती. तिथे कलाविष्कार सादर करण्याचा अनुभव वेगळाच होता. नवा देश, नवा प्रांत तिथे भारतीय संगीताला कितपत दाद मिळणार, या विषयी मनात प्रश्न होते. मात्र, दैठणकर आणि मी सादर केलेल्या कलाविष्कारास भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमात भारतातील विविध प्रांतांतील नागरिक भेटले. त्यांनी मनापासून दिलेली दाद मी कधीही विसरू शकणार नाही. जागतिक पातळीवरही आपले संगीत किती लोकप्रिय आहे, याची
जाणीव या कार्यक्रमनिमित्ताने
झाली.’’ (प्रतिनिधी)