महापालिका तिजोरीत सतरा कोटी
By Admin | Updated: November 13, 2016 04:24 IST2016-11-13T04:24:27+5:302016-11-13T04:24:27+5:30
पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर चलन बदलून घेण्यासाठी तिसऱ्याही दिवशी उद्योगनगरीतील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांसमोर तोबा गर्दी झाली होती.

महापालिका तिजोरीत सतरा कोटी
पिंपरी : पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर चलन बदलून घेण्यासाठी तिसऱ्याही दिवशी उद्योगनगरीतील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांसमोर तोबा गर्दी झाली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करून घ्यावा लागला. लांबच लांब लागलेल्या रांगा, बँकांचे विस्कळीत झालेले नियोजन यामुळे स्वत:च्या पैशांसाठीच नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दोन दिवस उलटूनही एमटीएम सेवा बंद होती. दोन दिवसात १७ कोटींचा कर जमा झाला.
मिळकत करापोटी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा महापालिकेकडून स्वीकारल्या जात असल्याने शुक्रवारी एकाच दिवसात महापालिकेकडे ‘रेकॉर्ड बे्रक’ भरणा झाला. शुक्रवारी रात्री बारापर्यंत तब्बल १२ कोटी ४५ लाखांचा कर जमा झाला.
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा अचानक रद्द केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासह मिळकत करापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयातही स्वीकारल्या जात आहेत. दरम्यान, कर भरण्यासाठी पाचशे, हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याबाबतची मुदत वाढविण्यात आल्याने शनिवारीही कर भरण्यासाठी गर्दी दिसत होती.
शुक्रवारी रात्री बारापर्यंत महापालिकेच्या १६ कार्यालयांमध्ये मिळकत करापोटी पाचशे, हजारच्या नोटा जमा करण्यासाठी मिळकतधारकांनी गर्दी केली होती. यामुळे कार्यालयांसमोर लांबच लांब रांगा दिसत होत्या. यामुळे शुक्रवारी रात्री बारापर्यंत सहा हजार २३१ मिळकतधारकांकडून १२ कोटी ४५ लाख ५० हजार ५१५ इतका कर जमा करण्यात आला. यामध्ये ११ कोटी ८२ लाख ४६ हजार रोख स्वरूपात, तर ५७ लाख २२ हजार धनादेशाद्वारे आणि पाच लाख ८२ हजार आॅनलाईनद्वारे कर जमा केला. मिळकत करापोटी अद्यापपर्यंत एका दिवसात सर्वाधिक १० कोटी ७९ लाखांचा भरणा झाला होता. मात्र, शुक्रवारी तब्बल साडेबारा कोटींचा भरणा झाला. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा हा ‘रेकॉर्ड ब्रेक’ भरणा ठरला.
दरम्यान, कर भरण्यासाठी पाचशे, हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याबाबतची मुदत वाढविण्यात आल्याने शनिवारीही कर भरण्यासाठी गर्दी दिसत होती. शनिवारी सुटीचा दिवस असल्याने नोकरदार वर्गाचे प्रमाण अधिक होते. शनिवारी सायंकाळी चारपर्यंत एक हजार ५७४ मिळकतधारकांनी दोन कोटी ७२ लाखांचा कर जमा केला. यासह रात्री उशिरापर्यंत कर भरणा सुरूच होता. चलनातून बंद झाल्याने अनेक नागरिकांनी अशा नोटा कर भरण्यासाठी उपयोगात आणल्या. त्यामुळे नागरिकांची कराची रक्कम भरली गेली. (प्रतिनिधी)
थकबाकीची
रक्कमही जमा
मिळकत करवसुलीसाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. अधिकची थकबाकी असल्यास जप्तीची कारवाई देखील केली जाते. तरीही कर वसुली करताना अधिकाऱ्यांची दमछाक होते. मात्र, जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने अनेक दिवसांपासूनची थकबाकीही मिळकतधारकांकडून जमा झाल्याचे दिसून येत आहे.
सुट्या पैशांचे कारण देत आदेश केरात
अत्यावश्यक सुविधांच्या ठिकाणी पाचशे व हजारांचा नोटा स्वीकारणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले. मात्र, शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. निगडी येथील एका मेडिकलमध्ये १६० रुपये किमतीची औषधे खरेदी केल्यानंतर पाचशे रुपयांची नोट दिली. मात्र, उरलेले पैसे देण्यासाठी आमच्याकडे सुटे पैसे नाहीत. त्यामुळे यातील शिल्लक रकमेच्या इतर वस्तूंची खरेदी करावी लागेल किंवा दुसरीकडून औषधे घ्या असे सांगण्यात आले. असाच अनुभव आणखी चार मेडिकल स्टोअरमध्ये आला. थेट नोटा न नाकारता असे सुट्या पैशाचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
पेट्रोलपंप, बिल भरणा केंद्राकडून अडवणूक
पेट्रोल, वीज बिले भरण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच मिळकतकर भरण्यास मुदतवाढ दिल्याने करसंकलन कार्यालयात गर्दी दिसून आली. दोन दिवसांत १७ कोटींची वसुली झाली आहे. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच भाजी बाजारात खरेदी करणाऱ्या नागरिकांना सुटे पैसे नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागला.