पावसाने बळीराजा सुखावला
By Admin | Updated: July 21, 2015 03:42 IST2015-07-21T03:42:04+5:302015-07-21T03:42:04+5:30
दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे

पावसाने बळीराजा सुखावला
किवळे : दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. भात व खरीप पिकासाठी हा पाऊस अत्यंत पोषक असला, तरी भातलागवडीसाठी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने पेरणी केलेल्या भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस भातपीक व खरिपाच्या पिकांसाठी अनुकूल असला, तरी पिकांच्या जोमदार वाढीसाठी दमदार पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी चांगल्या, दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, काही शेतकरी मात्र भातलागवडीची तयारी करीत असल्याचे दिसत होते. पाऊस पडत असतानाही काहींनी विहिरीचे पाणी खाचरात सोडून दिले होते.
शिरगावसह पवन मावळात पावसाची जोरदार हजेरी
शिरगाव : गेली अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने शिरगावसह पवन मावळात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिरगाव, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, कासारसाई, सोमाटणे, परंदवडी, चांदखेड परिसरात पावसास सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसामुळे जमिनीवर माना टाकलेली पिके तजेलदार दिसू लागली आहेत. या पावसाचा फायदा भुईमूग, भात, सोयाबीन, चवळी, मूग, घेवडा आदी पिकांसह उसालादेखील होणार आहे.
काही ठिकाणी पावसाअभावी रखडलेल्या पेरणीच्या कामाला पावसामुळे पुन्हा वेग येणार आहे. भातरोपांनाही पावसामुळे जीवनदान मिळाले असून, लागवडीसाठी
पोषक असे वातावरण निर्माण
झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भातलागवड करण्यास सुरुवात केली आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाली असल्याने दुबार पेरणीचा प्रश्न सुटला असल्याचे मत शिरगाव येथील भानुदास गोपाळे यांनी सांगितले.(वार्ताहर)