रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: July 24, 2015 04:23 IST2015-07-24T04:23:15+5:302015-07-24T04:23:15+5:30
विठ्ठलनगरचे पुनर्वसन इमारतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याला अस्वच्छता हेच कारण आहे. येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे

रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी : विठ्ठलनगरचे पुनर्वसन इमारतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याला अस्वच्छता हेच कारण आहे. येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. झोपडपट्टी भागाकडेही महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येथे साफसफाईसाठी सोसायटीने काही कामगार नेमले आहेत. त्यांच्याकडे इमारतीची साफसफाई आणि इमारतीसमोर असणारा रस्ता साफ करण्याचे काम असते. पण, ते व्यवस्थित होत नाही. मैला पाण्याचे तुंबलेले चेंबर साफ करण्यासाठी हे कामगार नकार देतात. त्यामुळे डासोत्पत्ती वाढते. डेंग्यू, मलेरिया, थंडी-तापाचे रुग्ण परिसरात वाढत आहेत. येथे महापालिकेकडून अधूनमधून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. परंतु, त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही.
तसेच, विठ्ठलनगर पुनर्वसन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी खाली टाक्या आहेत. त्यामध्ये महापालिकेचे पाणी सोडले जाते व नतंर प्रत्येक इमारतीवर असणाऱ्या टाक्यांमध्ये ते पाणी सोडले जाते. पाण्याची टाकी साफ केली जात नाही. तसेच, टाकीत शेवाळे साठलेले असते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून इमारतीमध्ये राहण्यास आल्यापासून लोकांच्या आजारपणामध्ये वाढ झाली आहे. काही वयस्कर माणसे कधी जास्त पायऱ्यांचा वापर करत नव्हते. ते येथे आल्यापासून जिने चढणे-उतरणे यामुळे त्यांना पाय दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे असा त्रास होऊ
लागला आहे. (वार्ताहर)