बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST2017-09-22T00:51:34+5:302017-09-22T00:51:45+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे.

बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे. आॅक्टोबरचा मुहूर्त महापालिकेने काढला असला, तरी जोपर्यंत उच्च न्यायालयातील याचिकेवरील स्थगिती उठविली जात नाही, तोपर्यंत या प्रकल्पाला गती मिळणे अवघड आहे.
महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला होता. त्या अंतर्गत शहरातील बीआरटी सुरू करण्याचा प्र्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले गेले. शहरातील पहिल्या मार्गाचे काम २००९ मध्ये सुरू झाले. हा मार्ग होता निगडी ते दापोडी. या मार्गावर ग्रेड सेपरेटर असल्याने बीआरटी कशी राबवायची याचे नियोजन तत्कालीन सत्ताधाºयांनी केले नव्हते. त्यामुळे हा प्रकल्प सत्ताधाºयांच्या अंगलट येऊ नये, म्हणून मार्ग तयार होऊनही सुरू केला नाही. या मार्गावर ‘मर्ज इन आणि मर्ज आऊट’ येथे कोणती व्यवस्था करायची याबाबत नियोजन झाले नव्हते. या ठिकाणी अपघात होऊ शकतात, अशी शक्यता वाहतूक पोलीस विभागानेही व्यक्त केली होती. तसेच या रस्त्याचे सेफ्टी आॅडिट न झाल्याने एक याचिका दाखल झाली. त्यामुळे मार्ग सुरू होण्यास खोडा बसला होता. कोट्यवधी रुपये खर्चूनही गेल्या आठ वर्षांत मार्ग सुरू झालेला नाही.
केवळ आश्वासनेच
दापोडी ते निगडी बीआरटीबाबत सत्ताधारी आणि प्रशासन केवळ आश्वासनेच देत आहे. अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. राष्टÑवादी काँग्रेसनेही तीन वेळा उद्घाटनाचा मुहूर्त काढला होता. त्यानंतर भाजपानेही मे, आॅगस्ट आणि आता आॅक्टोबर असा मुहूर्त काढला आहे. अनेक वेळा मुहूर्त काढूनही बीआरटी मार्ग सुरू झालेला नाही. हा मार्ग कधी सुरू होणार असा प्रश्न शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
>दापोडी ते निगडी मार्गावरील बीआरटी मार्गावरील बसथांब्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मार्गावर १४ बसस्टॉप आहेत. तसेच सिग्नल यंत्रणेचे काम सुरू आहे. आयआयटीच्या पथकामार्फत आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरक्षेसंदर्भात चाचण्या होतील. त्यानंतर या संदर्भातील रिपोर्ट न्यायालयात सादर करून बीआरटी सुरू करण्यासंदर्भात परवानगी मागता येईल. सुरक्षा रक्षक नियुक्तीचे काम सुरू आहे. या मार्गाविषयी पीएमपी प्रमुखांशीही चर्चा झाली आहे. बस यंत्रणाही सज्ज आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त