स्मार्ट सिटी सहभागासाठी सव्वादोनशे सूचना प्राप्त
By Admin | Updated: July 13, 2015 03:59 IST2015-07-13T03:59:45+5:302015-07-13T03:59:45+5:30
महापालिकेकडे स्मार्ट सिटी सहभागाबाबत २२५ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सूचनेच्या आधारे महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीची प्रवेशिका तयार केली आहे.

स्मार्ट सिटी सहभागासाठी सव्वादोनशे सूचना प्राप्त
पिंपरी : महापालिकेकडे स्मार्ट सिटी सहभागाबाबत २२५ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सूचनेच्या आधारे महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीची प्रवेशिका तयार केली आहे.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यासाठी १५ निकष आहेत. त्यानुसार शहरे समाविष्ट केली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर या शहरांना राज्य सरकारकडून १५० कोटी, तर महापालिकेकडून ५० कोटी असा एकूण २०० कोटींचा निधी मिळणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभागनिहाय सभा घेण्यात आल्या. त्यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या. सिटी वायफाय व्हावी, पथदिव्यांसाठी सौरदिव्यांचा वापर करावा, शहरात पिंपळ व चिंच वृक्षलागवड करावी, ओला व सुका कचरा शंभर टक्के विघटनाची सोय करावी, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, उद्यानामध्ये स्वच्छतागृह उभारावीत, महापालिकेने सर्व शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात आदी सूचना प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त सूचनांमध्ये ‘ब’ प्रभाग कार्यालयाकडून ८८ सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर ‘ई’ कार्यालयांतर्गत फक्त ११ सूचना मिळाल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून ३६, ‘क’ मधून ४०, ‘ड’ मधून २६, ‘फ’ मधून २४ सूचनांचा समावेश आहे. हा अहवाल ३० जुलैपर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार
असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)