कारवाईत तत्पर, नियोजनात मात्र मागे
By Admin | Updated: February 5, 2016 01:47 IST2016-02-05T01:47:48+5:302016-02-05T01:47:48+5:30
वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करीत फक्त दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. चिंचवड परिसरात सध्या वाहतूक शाखेचे कर्मचारी

कारवाईत तत्पर, नियोजनात मात्र मागे
चिंचवड : वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करीत फक्त दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. चिंचवड परिसरात सध्या वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहन तपासणी करण्यात व्यस्त आहेत. या प्रकाराबाबत नागरिक हैराण झाले आहेत. दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था ही सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांची लूट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
परिसरात सुरू असलेली अवैध वाहतूक, रस्त्यावर उभी असलेली व्यावसायिक वाहने, सम-विषम पार्किंग व्यवस्था असूनही मनमानी पद्धतीने उभी असणारी वाहने, अवजड वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची होणारी वाहतूक व त्रासदायक ठरत असलेली वाहतूककोंडी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहन तपासणीसाठी तत्पर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाहतूक शाखेच्या या कारवाईबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांची होणारी अडवणूक बंद झाली. मात्र, चिंचवड परिसरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर, चापेकर चौकातून तानाजीनगरकडे जाणारा रस्ता, शहीद अशोक कामठे बसस्थानक परिसर, काळेवाडीकडे जाणारा रस्ता व अहिंसा चौक या भागात नियमित कारवाई सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनचालकांना तपासणीसाठी थांबवितात. वाहन परवाना, पीयूसी,हेल्मेट, वाहनाचे कागदपत्रे अशा विविध तपासण्या केल्या जातात. दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या दंडाची कारवाई केली जाते. (वार्ताहर)
वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनचालकांना दंडात्मक करवाईसाठी आग्रह धरतात. आमचे टार्गेट पूर्ण करावे लागते हे सांगत असतात. मात्र हे टार्गेट म्हणजे काय आहे हे न उलगडणारे कोडे आहे. हे टार्गेट पोलिसांना कोण देत आहे व किती टार्गेट आहे, हे मात्र समजत नाही. काही वाहतूक पोलीस याबाबत वरिष्ठांनी सांगितले असल्याचे सांगत आहेत. मात्र हे वरिष्ठ कोण आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.