पवनाथडीवरून ‘रस्सीखेच’
By Admin | Updated: October 31, 2015 01:00 IST2015-10-31T01:00:26+5:302015-10-31T01:00:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दर वर्षी आयोजित करण्यात येणारी पवनाथडी जत्रा नदीच्या अलीकडे आयोजित करायची की पलीकडे, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे

पवनाथडीवरून ‘रस्सीखेच’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दर वर्षी आयोजित करण्यात येणारी पवनाथडी जत्रा नदीच्या अलीकडे आयोजित करायची की पलीकडे, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मागील महिन्यात महिला व बालकल्याण समितीने सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘पवनाथडी जत्रा’ घेण्याचा ठराव केला असताना स्थायी समितीने मात्र उपसूचनेद्वारे ही जत्रा सांगवीत भरविण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ही जत्रा पिंपरीतील एचए मैदानावर भरविण्याचा ठराव महिला बालकल्याण समितीने केला असल्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही पवनाथडी जत्रेवरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत शहरात दर वर्षी ‘पवनाथडी जत्रे’चे आयोजन केले जाते. यंदाही डिसेंबर महिन्यात या जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मात्र, ही जत्रा नदीच्या अलीकडे आयोजित करायची की पलीकडे, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. ज्या भागात आयोजन केले जाईल, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीत फायदा होत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे आपल्याच प्रभागात जत्रेचे आयोजन व्हावे, यासाठी ताकद पणाला लावली जाते.
दरम्यान, या जत्रेत सर्वांनाच सहभागी होता येत नाही. सर्वांना सहभागी करवून घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘पवनाथडी जत्रे’चे आयोजन करावे, असा ठराव २३ सप्टेंबरला झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत करण्यात आला होता. त्यानुसार सहा क्षेत्रीय कार्यालयांत जत्रेचे आयोजन करणे व त्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव २९ सप्टेंबरच्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजनाचा निर्णय झाला.(प्रतिनिधी)