पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए बोलत असल्याचे सांगून पिंपरीमधील हॉस्पिटलला खंडणी मागण्याच्या प्रकार ताजा असताना आता पुण्यातही एकाला पैसे मागण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांचे कोथरुड येथील कार्यकर्ते डॉ. संदीप बुटाला यांच्याकडून याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या ओळखीचे तलाठी यांना एक फोन आला होता. फोन करणार्याने आपण पाटील यांचे पीए सावंत बोलत असल्याचे सांगून दुसर्या व्यक्तीकडे फोन दिला. त्याने आपण पाटील बोलत असल्याचे सांगून कोरोना महामारीच्या काळात आपण जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. या कामासाठी पैशाची गरज असून तुम्ही आर्थिक मदत करा, असे बोलणे झाल्याचे समजले. त्यानंतर पाटील यांनी माहिती घेतल्यावर निगडीमधील एका डॉक्टरांकडे अशाच प्रकारे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपल्या नावाचा व लोकसेवक पदाचा वापर करुन लोकसेवक असल्याची बतावणी करुन पैशांची खंडणी स्वरुपात मागणी करुन तसेच त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करुन आपली बदनामी केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावाने पुण्यातही खंडणी मागण्याचा प्रकार; चंद्रकांत पाटलांकडून तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 22:53 IST