रामा बिल्डर्सला दोन लाखांचा दंड
By Admin | Updated: April 10, 2016 03:59 IST2016-04-10T03:59:39+5:302016-04-10T03:59:39+5:30
स्वीस कौंटी या थेरगाव येथील गृहप्रकल्पात बिल्डरने माहितीपुस्तकात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी गृहप्रकल्पात सदनिका घेतलेल्या सभासदांनी पुणे जिल्हा

रामा बिल्डर्सला दोन लाखांचा दंड
पिंपरी : स्वीस कौंटी या थेरगाव येथील गृहप्रकल्पात बिल्डरने माहितीपुस्तकात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी गृहप्रकल्पात सदनिका घेतलेल्या सभासदांनी पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीत रामा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांनी तक्रारदार सभासदांना दंड व भरपाई म्हणून दोन लाख रुपये द्यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे.
स्वीस कौंटी या इमारतीत बिल्डरने ग्राहकांना दिलेल्या माहितीपुस्तिकेनुसार, तसेच करारात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही, या कारणास्तव रवी सोनी, दीपक लखनलाल सिंघल, राकेश वशिष्ठ यांनी रामा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे मोती पंजाबी, राजू पंजाबी, जितू पंजाबी, नरेश पंजाबी या संचालकांविरोधात पुणे ग्राहक मंचात अर्ज दाखल केला होता. करारानुसार सदनिकाधारकांना सोयी, सुविधा पुरविल्या नसल्याने गैरसोय होत असल्याचे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले होते. तक्रारदार ग्राहकांनी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.
न्याय मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख, सदस्य एस. के. पाचरणे यांनी या प्रकरणी निकाल दिला आहे. त्यामध्ये सुविधांची पूर्तता केली नाही म्हणून तीन तक्रारदारांना रामा बिल्डर्सच्या संचालकांनी एकत्रित दोन लाख रुपये भरपाई म्हणून द्यावेत. लिफ्टला बॅटरी बॅकअप द्यावे, तक्रारीचा खर्च म्हणून तक्रारदारांना पाच हजार रुपये द्यावेत.
निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून सहा आठवड्यांत आदेशाची पूर्तता करावी. अन्यथा दर दिवशी २०० रुपयेप्रमाणे सोसायटीस दंड द्यावा लागेल, असे निकालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)