पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर तिरंगा दिमाखात फडकत असताना रविवारी (दि. १४) कझाकस्तानमध्येही तिरंगा अभिमानाने आकाशात उंचावला. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू होती. शरीर थकले, पण मन थकले नाही तर हे शक्य आहे, असे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने जिद्द सोडली नाही. त्यातून यश खेचून आणले आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ‘खाकी’ची जबादारी पार पाडतानाच त्याला ‘चारचांद’ लावले. मात्र, हे सहज शक्य नाही, कारण ‘ट्रायथलाॅन’ ही स्पर्धा थरारक होती. हे अनुभव आहेत ‘आयर्न मॅन’ ठरलेले पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांचे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ‘आयर्न मॅन’चा प्रवास उलगडला...
कझाकस्तानमधील नूर सुलतान शहरातील ‘आयर्न मॅन’ची ट्रायथलाॅन ही स्पर्धा १४ ऑगस्ट २०२२ रोजी झाली. इशिम नदीच्या गार पाण्यात ३.८ किलोमीटर पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली खरी पण श्वास घेताना त्रास होऊ लागला. स्पर्धेचं मनावर ओझ वाटू लागलं. बाहेर पडावं वाटत होतं, पण तरीही स्वतःला नॉर्मल केलं आणि एक तास ३६ मीनिटांमध्ये ३.८ किलोमीटर अंतर पोहण्यात यश मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. ‘ट्रांजेक्शन टाईम’ घेऊन सायकलिंग चालू केले. रस्त्यावर एकही खड्डा, गतिरोधक नसल्याने माझी ‘धन्नो’ सुसाट सुटली. १५ किलोमीटरनंतर शहराबाहेर पठार होते. रस्त्याच्या कडेला एकही मोठे झाड नव्हते. त्यामुळे वारा थेट सायकलवर आदळायचा. परिणामी एकसारखी गती ठेवता येत नव्हती. इलाईट कॅटेगरीचे सायकलपटू सुसाट जात होते. मीही गिअर मोड बदलला आणि वेग घेतला. यात १८० किलोमीटर अंतर सायकलवरून एकदाही खाली न उतरता पाच तास ४२ मीनिटांमध्ये सायकलिंग पूर्ण केले. सायकलला मिठी मारून तिचे आभार मानले. आता स्पर्धा हातात आली होती, कारण ‘रनिंग’बाबत जास्त अडचण, भीती नव्हती.
अस्तना ट्रायथलाॅन पार्कमध्ये दुपारी दोनच्या सुमारास ऊन्हात ४२ किलोमीटरसाठी ‘रनिंग’ सुरू झाली. यात २१, ११, ५, ५ असे टप्पे केले. पहिल्या टप्प्यात हार्ट रेट १४० ठेवून दोन तासात २१ किलोमीटर अंतर पूर्ण केले. उन्हामुळे शरीराचे तापमान वाढत होते. न्यूट्रिशन पॉईंटला थंड पाण्याचा स्पंज डोक्याला मानेला छातीला लावला. पुढच्या एक तासात ११ किलोमीटर अंतर पूर्ण करायचे होते. परंतु १० किलोमीटरच पूर्ण झाले. परंतु हार्ट रेट १४० च्या खाली होता. त्यामुळे एक किलोमीटर अंतर कमी झाले तरी चिंता नव्हती.
११ तास ५० मिनिटांच्या ‘ड्रीम टायमिंग’मध्ये स्पर्धा पूर्ण
अतिशय सुंदर अशा पार्कमध्ये १० किलोमीटरचे चार लूप रनिंग करायची होती. कॉलेजची मुलं-मुली ‘रनर’चा आत्मविश्वास वाढवत होते. कुठे म्युझिक स्टॉल होते, तर काही ठिकाणी भारतीय लोक हातात तिरंगा घेऊन ‘कमॉन इंडिया’ अशा घोषणा देत प्रोत्साहित करीत होते. त्यामुळे उत्साह संचारला आणि तिरंगा हातात घेऊन ४२ किलोमीटर अंतर चार तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण केले. ‘राम गोमारे, यू आर ॲन आयर्न मॅन’ हे शब्द कानावर पडताच डोळे पाणावले. गेल्या वर्षभर ठेवलेल्या संयमाला वाट मोकळी केली. दिवसभरातील हा सर्व प्रवास ११ तास ५० मिनिटांमध्ये पूर्ण केला. हा ‘टायमिंग’ अनेक ‘ट्रायथलीट’चा ‘ड्रीम टायमिंग’ असतो.
गेले वर्षभर कष्ट घेतले ते तर सार्थकी लागले होतेच, पण ‘आयर्न मॅन’ स्पर्धेच्या त्या दिवसभरात माझी माझ्याशीच असलेली ही एक लढाई मी जिंकल्याची भावना झाली होती. स्पर्धेच्या दिवशी शरीर थकले तरी चालेल पण मन थकले नाही तर स्पर्धा आपण पूर्ण करू शकतो, हे मी स्वत:ला बजावत होतो.
- आयर्न मॅन राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे