‘रावेतला महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा’
By Admin | Updated: July 27, 2015 03:49 IST2015-07-27T03:49:05+5:302015-07-27T03:49:05+5:30
वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, रावेत परिसर आदी ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे

‘रावेतला महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा’
रावेत : वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, रावेत परिसर आदी ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत महापालिकेला महिला स्वच्छतागृह बांधता आले नाहीत. महिला सबलीकरणासाठी पालिका विविध प्रकारचे धोरण राबविताना
आवश्यक त्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची निर्मिती का
करीत नाही, असा प्रश्न महिलांना पडला आहे.
वाल्हेकरवाडीतील मुख्य शिवाजी चौकात महापालिकेची शाळा, महापालिकेचे रुग्णालय, भाजीविक्रेते, पीएमपीलचा मुख्य बस स्टॉप आदी सतत वर्दळ असणारे ठिकाण आहे. येथे इतर ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या महिला प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे या मुख्य चौकात महिलांसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. गुरुद्वारा चौकात नेहमी विद्यार्थिनींची परिसरातील विविध महाविद्यालयांत जाण्यासाठी सतत गर्दी असते. येथेही महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला व विद्यार्थिनींची कुचंबणा होते. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. ही गैरसोय केवळ पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण होत नाही, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
एकता महिला बचत गटाच्या अध्यक्षा उमा माळी म्हणाल्या, ‘‘परिसरातील महिलांना कामानिमित्त बाहेर सतत जावे लागते. महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न असून, या संदर्भात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करून महिलांची व विद्यार्थिनींची होणारी गैरसोय दूर करावी.’’
राणी जांभळे म्हणाल्या, ‘‘एक ना अनेक कामानिमित्त आम्हा महिलांना नित्याने घराबाहेर जावे लागते. परिसरात कोठे महिला स्वच्छतागृह नसल्यामुळे आम्हा महिलांना त्रास सहन करावा लागतो.’’(प्रतिनिधी)