पुरंदर उपसाचे पाणी पेटणार
By Admin | Updated: July 4, 2014 06:38 IST2014-07-04T06:38:40+5:302014-07-04T06:38:40+5:30
आमदार विजय शिवतारे यांनी अडवणूक केल्यामुळे पुरंदर उपसा योजनेचे पाणी बारामती तालुक्यातील गावांना देण्यासाठी अडथळा येत आहे

पुरंदर उपसाचे पाणी पेटणार
मोरगाव : आमदार विजय शिवतारे यांनी अडवणूक केल्यामुळे पुरंदर उपसा योजनेचे पाणी बारामती तालुक्यातील गावांना देण्यासाठी अडथळा येत आहे, असा आरोप करीत आज बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निषेध व धरणे आंदोलन केले.
शिवतारे यांना सुबुद्धी देण्यासाठी मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वरला बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिषेक करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी बारामतीच्या जिरायती भागात पुरंदर उपसा योजनेचे पाणी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केली होती.
मागील दीड वर्षापासून बारामतीच्या जिरायती भागातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीतदेखील उमटले.
त्यामुळे युद्धपातळीवर या गावांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, पुरंदरमधील दुष्काळी गावांनादेखील पाणी द्या, अशी मागणी करत शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीला पाणी वळविण्यावरून विरोध केला आहे.
मात्र, केवळ भावनिक विरोध करून पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे या योजनेचे काम अडविले जात आहे, असा आरोप या
वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. बैठका घेऊन त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला आहे; मात्र शिवतारे विरोधासाठी विरोध करीत आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला.
या संदर्भात आमदार विजय शिवतारे म्हणाले, बारामती तालुक्यातील गावांना पाणी
देण्यास माझा विरोध नाही.
मात्र, ज्याप्रमाणे तालुक्यातील
गावे क्षेत्रफळाप्रमाणे सिंचनासाठी घेतली आहेत, त्याप्रमाणे पुरंदर तालुक्यातील गावे या
योजनेत सिंचनासाठी समाविष्ट करून घ्यावीत. पंधरा वर्षे सत्तेवर
राहूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या तालुक्यातील पाणी
प्रश्न सोडवता आला नाही. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन पवार राजकीय खेळी करीत आहेत.(वार्ताहर)