पिंपरी : उद्योगनगरीत असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, ते सामाजिक सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत. त्यांना आजारपणात मोफत वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, तर खासगी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांनाही कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा (ईएसआयसी) लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात बांधकाम मजूर, घरेलू कामगार, रिक्षाचालक, रोजंदारीवरील कामगार, मजूर, पथारीवाले, भंगार गोळा करणारे, आदी असंघटित कामगार आहेत. त्यांना कोणतीही स्थिर नोकरी किंवा सामाजिक सुरक्षा नसते. आरोग्य विमा व पेन्शनची सोयही नाही. अनेकदा अपघात, आजार किंवा शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांमध्ये हजारोंचा खर्च करावा लागतो. काहीवेळा उपचारांअभावी रुग्णांचा जीवही जातो. सरकारी रुग्णालयांमधील गर्दी, तांत्रिक अडचणी आणि औषधांचा अभाव या कारणांनी त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने इएसआयसीची व्याप्ती वाढवून असंघटित क्षेत्रातील मजुरांनाही या योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी असंघटित कामगार व संघटनांकडून केली जात आहे. काय आहे ईएसआयसी योजना...
ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. याअंतर्गत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचार, आजारपण भत्ता, प्रसूती लाभ, अपघातातील नुकसानभरपाई आणि मृत्यूपश्चात कुटुंबीयांना आर्थिक मदत आदी लाभ दिले जातात. त्यासाठी कामगाराच्या एकूण वेतनातून ०.७५ टक्के, तर कंपनी मालकाकडून कामगाराच्या वेतनाच्या ३.७५ टक्के योगदान ईएसआयसीकडे जमा केले जाते. त्यातून कामगारांना विविध लाभ दिले जातात.
असंघटित कामगारांना पीइएसआयसीचे लाभ देण्याबाबत कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे त्यांना ईएसआयसीचे लाभ देता येत नाही, परंतु याबाबत केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. - अमित साळगावकर, शाखा व्यवस्थापक, इएसआयसी, पिंपरी.
इएसआयसी ही केंद्र सरकारची योजना असून, ती विश्वासपात्र आहे. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळावा यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे. या योजनेचे लाभ असंघटित कामगारांना मिळाल्यास त्यांना आजारपणात उपचारांसाठी कर्जबाजारी व्हावे लागणार नाही. - काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघअसंघटित क्षेत्रातील सर्वच कामगारांना इएसआयसीचे लाभ मिळावेत यासाठी सीटू केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करीत आहे. इएसआयसीच्या कायद्यात बदल करून या घटकांना वैद्यकीय उपचारांसह अन्य लाभ देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. - गणेश दराडे, जिल्हा सहसचिव, सिटू (सेंट्रल इंडियन ट्रेड युनियन)
आम्ही दिवसभर घरकाम करतो. आजारपणात रजा घेतल्यास त्याचे पैसे मालक देत नाहीत. इएसआयसीचे लाभ मिळाल्यास वैद्यकीय उपचार मोफत होतील. शिवाय रजा कालावधीचे पैसे मिळतील.-सरस्वती प्रधान, घरेलू कामगार
Web Summary : Many unorganized workers in Pimpri-Chinchwad lack ESIC benefits like healthcare. They face financial hardship during illness. Demands rise for ESIC inclusion to provide medical and financial security.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में कई असंगठित श्रमिकों को स्वास्थ्य सेवा जैसे ईएसआई लाभ नहीं मिलते हैं। वे बीमारी के दौरान वित्तीय कठिनाइयों का सामना करते हैं। चिकित्सा और वित्तीय सुरक्षा प्रदान करने के लिए ईएसआई में शामिल करने की मांग बढ़ रही है।