- गोविंद बर्गे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसाठी स्वतंत्र जिल्हा उद्योग केंद्र नसल्याची खंत येथील उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. उद्योगांशी संबंधित अनेक योजनांची कामे, महत्त्वाचे निर्णय, बैठका पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा उद्योग केंद्रात होतात. परिणामी स्थानिक उद्योजकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यांना पुण्यात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकण एमआयडीसीसाठी शहरात स्वतंत्र उद्योग केंद्र सुरू करण्याची मागणी आहे.
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी क्षेत्रात १३ हजांराहून अधिक लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत असून, लाखोंना रोजगार मिळतो. मात्र, उद्योगांसंदर्भातील धोरणात्मक निर्णय, परवाने, पायाभूत सुविधा, पर्यावरणविषयक परवानगी यासंबंधीची कामे, बैठका पुण्यातील उद्योग केंद्रात होतात. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग चालवले जातात, समस्याही येथेच असतात. मात्र, याबाबतच्या बैठका शिवाजीनगर येथील कार्यालयात होतात. या बैठकांना वेळेवर उपस्थित राहणे शक्य होत नाही. तेथे कामांसाठी गेल्यास पूर्ण दिवस वाया जातो. एका फेरीत अधिकाऱ्यांची भेट होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे किमान दोन किंवा तीन फेऱ्या माराव्या लागतात. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते, अशा उद्योजकांच्या तक्रारी आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राची प्रमुख कामेजिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, जिल्हा पुरस्कार योजना, सुधारित बीज भांडवल योजना, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम यासह उद्योजकांच्या विविध बैठकाही घेतल्या जातात. लघु आणि कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देणे, उद्योजकता विकास, विविध सरकारी याेजनांमधून कर्ज आणि आर्थिक साहाय्य करणे, उद्याेगांचे प्रकल्प अहवाल आणि परवाने देणे, उद्योजकांसाठी एक खिडकी योजना, ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देणे, आदी कामे केली जातात.
पिंपरी-चिंचवड एमआयडीसीसाठी स्वतंत्र जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्याचे अधिकार आमच्या कार्यालयाला नाहीत. त्यासाठी मुंबईतील उद्योग संचालनालयाचे मुख्य कार्यालय किंवा उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे योग्य राहील.-संजय बांगर, उद्योग उपसंचालक, पुणे क्षेत्रिय कार्यालयशासनाच्या महिला उद्योजकांसाठी असलेल्या योजना केवळ घोषणा ठरत आहेत. त्या योजना महिलांसह अन्य छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.- जयश्री साळुंखे, उपाध्यक्षा, पिंपरी-चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना