पुणे : पती आणि सासरकडील मंडळींच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर येथील सातववाडीत घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२ रा.सातववाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी (वय ५३, रा.कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि प्रसाद पुजारी यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.
विवाहात हुंडा दिला नाही, तसेच व्यवस्थित मानपान केला नाही, म्हणून पती प्रसाद व त्याच्या घरातील लोक दीपाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. शेवटी दीपाने या छळाला कंटाळून सोमवारी (१९ मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याने दीपाचे वडील गुरुसंगप्पा पुजारी पुण्यात आले. दीपाच्या आत्महत्येस सासरची मंडळी जबाबदार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी पती व सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख अधिक तपास करत आहेत.