मालमत्ता कर, पाणीपट्टी भरा ‘मोबाइल अॅप’द्वारे
By Admin | Updated: October 14, 2016 05:32 IST2016-10-14T05:32:35+5:302016-10-14T05:32:35+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने आता मोबाइल अॅप विकसित केले

मालमत्ता कर, पाणीपट्टी भरा ‘मोबाइल अॅप’द्वारे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने आता मोबाइल अॅप विकसित केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या आपल्या मोबाइलवरून अॅपद्वारे कर भरता येणार आहे. या अॅपचे उद्घाटन गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिकेच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त दिनेश वाघमारे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत आदी उपस्थित होते.
या अॅपद्वारे मालमत्ताधारक आपला मालमत्ता क्रमांक आणि पाणी बिलाचा क्रमांक नोंदवून मालमत्तेची आणि पाणीपट्टीची संपूर्ण माहिती पाहू शकतात. कराचा भरणाही करू शकतात. त्यामुळे यापुढे नागरिकांना महापालिका कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. २५ टक्के मिळकतधारक मालमत्ता कराचा भरणा आॅनलाइन करतात. हे अॅप ‘प्ले स्टोअर’वरुन ‘एम-पीसीएमसी’ या नावाने डाऊनलोड करता येणार आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अंजली भागवत यांच्यासह ५६ जणांचा समावेश होता. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. प्रास्ताविक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. तर उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)