प्रचारतंत्र बदलले,पण...
By Admin | Updated: January 23, 2017 02:58 IST2017-01-23T02:58:50+5:302017-01-23T02:58:50+5:30
काही वर्षांपूर्वी निवडणुका जवळ आल्या, की मावळातील गावांमधील पार, चहा टपऱ्या, हॉटेलमध्ये गप्पांचे फड रंगायचे. त्या वेळी

प्रचारतंत्र बदलले,पण...
कामशेत : काही वर्षांपूर्वी निवडणुका जवळ आल्या, की मावळातील गावांमधील पार, चहा टपऱ्या, हॉटेलमध्ये गप्पांचे फड रंगायचे. त्या वेळी श्यामराव, भीमराव अशी बिरुदे मिरवणारे गावातील पुढारी आता दादा, भाऊ, नाना, साहेब आदी नावाने ओळखू लागले आहेत. ज्याप्रमाणे नावांच्या उपाध्यांमध्ये बदल होत गेला. त्याप्रमाणे निवडणुकीचे तंत्र व गावेही बदलत गेली.
तालुक्यातील इच्छुकांच्या नावाचा डंका पिटवत गावच्या पारावर बसून तंबाखू-बिडीच्या सोबत रंगणाऱ्या चर्चांनी सकाळ व सायंकाळी पार गजबजून जायचा. खेड्यापाड्यामधील लोक दिवसभर शेतात राबून औंदा कोणता उमेदवार निवडून द्यायचा याची चर्चा करत बसायचे. त्या वेळी घोंगडी बैठका, गावभेटी, घरभेटी, धावता दौरा, गावातील प्रमुखांशी संवाद, नातेसंबंध आदींच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांची प्रचार कामे चालत. याशिवाय बैलगाडी, सायकलींना झेंडे लावून प्रचार चालायचा.
कधी तरी एखादा जिल्हा पातळीचा नेता गावात मोटारगाडी घेऊन आल्यानंतर मोटारगाडी व नेता पाहण्यासाठी गर्दी जमायची. धुरळ्यात त्या मोटारगाडी मागे मुलांबरोबर गावातील राजकारणीही पळायचे. पण काळ बदलला व गावेही बदलू लागली. सायकलीच्या जागी दुचाकीने प्रवेश केला. टपालच्या जागी मोबाइल फोन आले. दुर्गम भागांतील गावांपर्यंत खड्ड्यांचे का होईना पण रस्ते पोहचले. सर्व काही जवळ जवळ आले. स्मार्ट फोनबरोबर थ्री जी व फोर जीचा जमाना आला. इंटरनेट रीचार्ज नागरिक व तरुण करू लागले. सोशल मीडियाचा वापर वाढला. शुभप्रभात व शुभरात्रीचे मेसेज फिरू लागले. कार्यकर्तेही भाऊ, दादा, नाना झाले. नेत्यांबरोबर सेल्फीचा जमाना आला. सोशल मीडियातून प्रसिद्धीचा फायदा राजकारण्यांना तर झालाच पण गावोगावी पुढारी जन्माला येऊ लागले. सभांमध्ये कानाजवळ जाऊन फोटो काढून भाऊंची अमुकतमुक नेत्यांबरोबर गंभीर विषयावर चर्चा असे फोटो सोशल मीडियावर अपलोड होऊ लागले. (वार्ताहर)