पोलीस वसाहतीला घेरलेय समस्यांनी
By Admin | Updated: November 2, 2015 00:43 IST2015-11-02T00:43:42+5:302015-11-02T00:43:42+5:30
सांडपाण्याची जलवाहिनी फुटल्यामुळे इमारतीच्या प्रत्येक घरामधील छताची गळती, सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा

पोलीस वसाहतीला घेरलेय समस्यांनी
सचिन देव, पिंपरी
सांडपाण्याची जलवाहिनी फुटल्यामुळे इमारतीच्या प्रत्येक घरामधील छताची गळती, सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा, धोकादायक वीज मीटर बॉक्स, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, संरक्षक भिंतीचे अर्धवट काम आदी समस्यांनी कृष्णानगर पोलीस वसाहतीमधील रहिवासी त्रस्त झाले असल्याचे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून आढळून आले.
पिंपरी - चिंचवड शहरामध्ये सेवेसाठी बाहेरील जिल्ह्यांमधून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चिखली येथील कृष्णानगर येथे पोलीस वसाहतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे चार मजल्यांच्या अकरा इमारती असून, त्यात १७६ घरे आहेत. या ठिकाणी काही कर्मचारी १५ वर्षांपासून, तर काही ५ ते ७ वर्षांपासून राहत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने त्यांची दुरुस्ती व देखभाल या विभागाकडून वेळेवर होणे गरजेचे आहे. वांरवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना धोका पत्करून राहावे लागत आहे.
पोलीस वसाहतीमधील चार व सहा नंबरच्या इमारतींमधील सांडपाण्याच्या वाहिनींना तडे जाऊन त्या फुटल्यामुळे त्याच्या पाइपातून घाण पाण्याची गळती सुरू आहे. बहुतांश मजल्यांवरील शौचालये व बाथरूममधील छत घाण पाण्याने गळत आहेत. यामुळे शौचालयेही खराब झाली आहेत. चार नंबर इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जिन्याजवळ तर इमारतीमधील पाणी झिरपून पाण्याची डबकी साचलेली दिसून आली. नागरिकांना इमारतीमध्ये जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. सहा नंबर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छताची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. सर्व ठिकाणी सांडपाण्याच्या वाहिन्या जुनाट झाल्यामुळे त्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात घाण पाण्याची गळती होत आहे.
आठ नंबर इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सांडपाण्याच्या तुटलेल्या वाहिनीचे घाण पाणी जात असल्यामुळे त्या टाकीतून गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशी सात नंबरच्या इमारतीमधून पिण्यासाठी पाणी घेऊन जावे लागत आहे. या इमारतीमधून त्या इमारतीत पाणी नेण्यासाठी महिलांना श्रम करावे लागत आहेत. शेवटच्या मजल्यावरील रहिवाशांना इलेक्ट्रिक मोटारीनेहीे पाणी वर चढत नाही. मात्र, दैनंदिन वापरासाठी पाण्याची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव तेच पाणी वापरावे लागत आहे.