निवडणुकीमुळे समस्यांचा पुळका

By Admin | Updated: July 25, 2015 04:50 IST2015-07-25T04:50:32+5:302015-07-25T04:50:32+5:30

महापालिका निवडणूक जवळ आल्याने महापालिका प्रशासनाकडे विविध समस्या मांडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या माध्यमातून इच्छुक स्वत:चे

Problems with elections due to elections | निवडणुकीमुळे समस्यांचा पुळका

निवडणुकीमुळे समस्यांचा पुळका

मंगेश पांडे, पिंपरी
महापालिका निवडणूक जवळ आल्याने महापालिका प्रशासनाकडे विविध समस्या मांडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या माध्यमातून इच्छुक स्वत:चे ‘ब्रँडिंग’ करीत आहेत. काही प्रमाणात विद्यमान नगरसेवकांनाही समस्यांचा पुळका आल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांना समस्यांची कड, की निवडणुकीची ओढ लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
रस्त्यावरील खड्डे, दवाखान्याची दुरवस्था, विस्कळीत पाणीपुरवठा, बंद पथदिवे यांसारख्या अनेक समस्यांसंदर्भात महापालिकेत निवेदन व तक्रारअर्ज रोज येत आहेत. स्थापत्य विभागाला मे आणि जून महिन्यात असे तब्बल १३० अर्ज प्राप्त झाले आहेत.
निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. नवख्या उमेदवारांना त्यासाठी जास्तच कसरत करावी लागते. तशी तयारी इच्छुक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. समाजसेवा करतोय हे दाखविण्यासाठी कशाच्या ना कशाच्या संदर्भात निवेदन दिले जात आहे. शिवाय संबंधित काम झाल्यानंतर हा प्रश्न आपणच सोडविला, ही बाबदेखील नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते.
महापालिकेत सध्या स्थापत्य विभागाला सर्वाधिक निवेदन प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये गतिरोधक उभारणे, खड्डे बुजविणे, पदपथांची दुरुस्ती आदी तक्रारींचा समावेश असतो. यासह वैद्यकीय विभाग, विद्युत विभाग यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात निवेदने येतात. नागरिकांशी संबंधित असलेल्या विभागात निवेदन देण्याकडे अधिक कल असतो.
प्रभागात छोट्या-मोठ्या समस्या राहून मतदारांचा रोष ओढवण्याची भीती असते. त्यामुळे कार्यकर्ते, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यमान नगरसेवकांचेही निवेदन देण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही जे प्रश्न सुटलेले नाहीत, असे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांनाही निवेदनांचा सपाटा सुरू केला आहे. स्थापत्य विभागात कार्यकर्त्यांपक्षा नगरसेवकांकडून आलेल्या निवेदनांचेच प्रमाण अधिक आहे.
स्थापत्य विभागासह इतर विभागांना प्राप्त होणाऱ्या निवेदनांची संख्या मार्च, एप्रिल या महिन्याच्या तुलनेत वाढली आहे. स्थापत्य विभागाला मार्च, एप्रिल महिन्यात ५० ते ५५ निवेदने आली होती. त्यामध्ये आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Problems with elections due to elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.