शिवकालीन शस्त्रांचे जतन
By Admin | Updated: October 21, 2015 00:52 IST2015-10-21T00:52:16+5:302015-10-21T00:52:16+5:30
आज एकविसाव्या शतकातदेखील काळाबरोबर धावताना, पारंपरिक रूढी, परंपरा जपताना स्वराज्याचे शिलेदार सरसेनापती दाभाडे दाम्पत्याचे वारसदार शिवकालीन शस्त्रांचा अनमोल खजिना

शिवकालीन शस्त्रांचे जतन
- गणेश बोरुडे ल्ल तळेगाव स्टेशन
आज एकविसाव्या शतकातदेखील काळाबरोबर धावताना, पारंपरिक रूढी, परंपरा जपताना स्वराज्याचे शिलेदार सरसेनापती दाभाडे दाम्पत्याचे वारसदार शिवकालीन शस्त्रांचा अनमोल खजिना
जतन करीत आहेत. दाभाडे घराण्याचे मूळ शस्त्र कट्यार, धोप तलवार, भाले, चंद्रकोर तलवारीचा समावेश असून, खंडेनवमीला शस्त्रांचे पूजन केले जाते.
तळेगावातील अनेक वास्तू आणि वस्तू त्याची साक्ष देत उभ्या आहेत. दाभाडे यांच्या राजवाड्याबरोबरच, दाभाडे दाम्पत्याने विविध लढायांत प्रत्यक्ष वापरलेली आणि जवळ बाळगलेली शस्त्रेदेखील याचाच एक भाग. प्रत्येक शस्त्र जितके जुने, तितकाच जुना इतिहासही प्रत्येकामागे लपलेला आहे.
शिवाजीमहाराज मावळात शिकारीवर असताना, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वडील तथा तळेगावचे पाटील येसाजीराव बजाजीराव दाभाडे राजांच्या चमूत होते. शिकारीत व्यस्त असलेल्या शिवरायांचे लक्ष विचलित झाले असता, एक रानडुक्कर राजांच्या दिशेने चाल करून येताना येसाजीरावांना दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित कमरेला लावलेली कट्यार काढून डुकराच्या मानेत खुपसून डुकराला ठार केले. हे धाडस पाहून शिवाजीमहाराजांनी येसाजीरावांना आपल्या जवळच्या खासगी अंगरक्षकांच्या तुकडीत समावेश केला. कट्यार हेच दाभाडे घराण्याचे मूळ शस्त्र म्हणून त्याला राजमान्यता घेतली. हेच येसाजीराव दाभाडे पुढे पन्हाळगडाच्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून विशाळगडाकडे प्रयाण करताना शिवाजीमहाराजांच्या मोजक्या मावळ्यांच्या तुकडीत होते, याचे दाखले इतिहासात सापडतात. तीच मूळ कट्यार आजही दाभाडे घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे जतन करीत आहेत. दाभाडे घराण्याच्या जरीपटक्यावर चिन्ह म्हणून आजही कट्यार पाहावयास मिळते. खंडेनवमीला शस्त्रपूजनावेळी मूळ शस्त्र म्हणून सर्वांत अगोदरचा मान या कट्यारीला आहे.
इसवी सन १६९०पासून मराठेशाहीत दाभाडे घराण्याकडे आलेली एकमेव धोप तलवार आजही दाभाडे यांच्या घरी पाहावयास मिळते. छत्रपती शिवरायांनी रचना केलेली, अस्सल ‘मराठा-तलवार’ म्हणून ओळखली जाणारी ही धोप तलवार आणि सध्या लंडनमध्ये असलेली शिवरायांची भवानी तलवार या दोहोंचीही निर्मिती स्पेनमधील तत्कालीन प्रसिद्ध शस्त्रनिर्मिती केंद्र ‘टोलेडो’ हेच होय. तसे ठसेदेखील या धोप तलवारीच्या पात्यावर कोरलेले दिसतात. अठरा धातूंची, ५० इंच लांब, दुधारी तलवार म्हणजे मराठेशाहीतील शस्त्ररचनेचा अप्रतिम नमुनाच म्हणावा लागेल. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची मूळ असलेल्या याच धोप तलवारीच्या जोरावर सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी १७३२च्या अहमदाबादच्या लढाईत जोरावर खान बाबी याच्या विरोधात विजय मिळवला होता.