- देवराम भेगडेदेहूरोड : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा व संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होण्यास अवघे १०-११ दिवस उरले असताना, पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठीचे तंबू खरेदी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भजनासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजांसह इतर भजन साहित्य दुरुस्ती, खरेदी व इतर कामांची लगबग दिसून येत आहे.
दिंड्यांच्या तयारीबाबत मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्था दिंडी क्र.३३ चे सचिव हभप सुदाम भेगडे, पवन मावळ दिंडीचे सचिव हभप उत्तम बोडके, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद महाराज राऊत, वैकुंठवासी हभप महादेवबुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप संतोष महाराज काळोखे, श्रीनाथसाहेब प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप माऊली नाणेकर आदी पदाधिकाऱ्यांनी पायी वारी नियोजनाबाबत माहिती दिली.आषाढी पायी वारीसाठी दिंड्याकडे असणारे सर्व पखवाज दुरुस्तीसह शाई भरणे, ओढ काढणे, पान बदलणे आदी कामे आळंदी व देहूतील संबंधित निष्णात कारागिरांकडून केली असून, गरजेनुसार भजन साहित्याची नव्याने खरेदी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. टाळ, वीणा आदी भजन साहित्य दुरुस्त केले आहे. वाटचालीत न मिळणारे काही साहित्य, तसेच किराणा खरेदी आदी कामे सुरू झाली आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी लागणारे विजेचे दिवे, छोटे जनरेटर, विद्युत व्यवस्था, आवश्यक ध्वनिवर्धक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
पालखी सोहळ्यात दिंडीचा मुक्काम असणाऱ्या विविध ठिकाणांची दिंडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी पूर्ण करून केली आहे. वारकऱ्यांना पायी वाटचालीत ठिकठिकाणी पंगती देणाऱ्या भाविकांशी संपर्क साधण्यात आला आहे. - हभप सुदाम भेगडे, सचिव, मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्था, दिंडी क्र.३३ .
यंदा वारीत अधिक पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गैरसोय होण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांना वाटचालीसाठी अडचणी येऊ नये, म्हणून दिंडीच्या सभासदांसह पदाधिकाऱ्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. - हभप मुकुंद महाराज राऊत, अध्यक्ष, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी.दिंडीतील सभासदांसह वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना, देणगीदार, पंगत देणारे भाविकांना कार्यक्रमपत्रिका व माहितीपत्रिका वाटप करण्यात येत आहे. - हभप उत्तम बोडके, सचिव, पवन मावळ प्रासादिक दिंडी क्र ३२.वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वारकऱ्यांसाठी पायी वाटचालीत मुक्कामासाठी लागणारे सर्व तंबू दुरुस्ती व डागडुजी करण्यात आले आहेत. आवश्यक सर्व साहित्यांची जमवाजमव करण्यात आली आहे. काही जुने तंबू खराब झाल्याने नवीन तंबूही खरेदी करण्यात आलेले आहेत. - हभप संतोष महाराज काळोखे , वैकुंठवासी हभप महादेवबुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडी. वारकऱ्यांना पंगत देणारे भाविक व देणगीदारांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. दिंडीतील किराणा सामान, तंबू, वारकऱ्यांचे बिछाने (वळकटी) आदी सामान ठेवण्यास वाहनांची व्यवस्था, पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे. - हभप ज्ञानेश्वर (माऊली) नाणेकर, अध्यक्ष, श्रीनाथसाहेब प्रासादिक दिंडी.