बेकायदा दारूला राजकीय पाठबळ

By Admin | Updated: July 25, 2015 04:47 IST2015-07-25T04:47:34+5:302015-07-25T04:47:34+5:30

भोसरी-दिघी, चिंचवड, नेहरूनगर परिसरातील अवैध दारूविक्रीमुळे शासनाला दर वर्षी कोट्यवधींचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे

Political support to illegal liquor | बेकायदा दारूला राजकीय पाठबळ

बेकायदा दारूला राजकीय पाठबळ

भोसरी : भोसरी-दिघी, चिंचवड, नेहरूनगर परिसरातील अवैध दारूविक्रीमुळे शासनाला दर वर्षी कोट्यवधींचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरातील किमान २० हॉटेल विनापरवाना दारू विक्री करत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोणीही या आणि दारूविक्री करा. त्यासाठी फक्त हवा आहे तुम्हाला भोसरी-चऱ्होली परिसरातील राजकीय व्यक्तीचा पाठिंबा. तो असेल, तर तुमच्या हॉटेलकडे पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही. हे चित्र पुणे-आळंदी रस्त्यावरील दिघीपासून चऱ्होली -आळंदी परिसरात बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे.
राजकीय आशीर्वाद व पोलिसांचे अभय असल्यामुळे या हॉटेलमधून कसल्याही प्रकारचा महसूल शासनाच्या तिजोरीत जात नाही. मात्र ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद या उद्योगासाठी आहेत, त्यांची तिजोरी मात्र भरत आहे. राजकीय दबाव व पोलिसांचे अर्थपूर्ण व्यवहार यामुळे दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा कर महासूल बुडत आहे. अवैधपणे चालणाऱ्या या दारूविक्रीबाबत कुंपणच शेत खात असेल, तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही.
भोसरी, दिघी व चऱ्होलीच्या प्रमुख रस्त्यांवर किमान ५० च्या आसपास हॉटेलमध्ये खुलेआम दारू विकली जाते. शहराच्या तुलनेत सर्वांत जास्त दारूविक्री भोसरी-दिघी परिसरात होत असून, अनधिकृत दारूविक्रीचे प्रमाण परमिटधारकांच्या तुलनेने जास्त आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश हॉटेल मुख्य रस्त्यालगत आहेत. परिसरात विनापरवाना हॉटेलची संख्या वाढू लागली आहे.
दिघी : दिघी, मॅगझिन चौक, ताजणेमळा, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली फाटा, भाटेवस्ती, डुडुळगाव, देहूरोड या परिसरात विनापरवाना कुठे हॉटेल, कुठे ढाबा, तर कुठे फॅमिली गार्डनच्या नावाखाली खुलेआम परवानाधारक हॉटेलप्रमाणे देशी-विदेशी दारूची विक्री केली जाते. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर किंवा प्रदर्शनी भागात फॅमिली गार्डन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चुलीवरची भाकरी, चुलीवरचे मटन मिळेल, असे फलक दिसत असले, तरी प्रत्यक्षात अनेक हॉटेलमध्ये केवळ दारूच विकली जाते. जेवणाचा थांगपत्ताच नसतो. हॉटेलमध्ये दारूविक्रेत्यांची उत्पादन विभाग व पोलीस अधिकाऱ्यांशी चांगली मैत्री असल्याचे दिसून येते. याच पाठबळावर या परिसरात नव्याने हॉटेल व्यावसायिकांनी हा फायदेशीर व्यवसाय म्हणून हाच व्यवसाय निवडला आहे. चऱ्होली फाटा, खाणी विभागात खुलेआम हातभट्टीची दारू विकली जाते. हॉटेलचालकाविरुद्ध कार्यवाही होईल काय? नियमानुसार महसूल गोळा होणार काय? होत नसेल, तर हे व्यवसाय बंद करणार काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

नेहरूनगर : कधी तरी पोलीस येतात. हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई होते. दोन दिवस अड्डे बंद ठेवले जातात. पुन्हा सुरू होतात. तळीरामांची मैफल पुन्हा जमते. हे गणित गेल्या कित्येक वर्षांपासून येथील विजयप्रभा सोसायटी परिसर, विठ्ठलनगर झोपडपट्टी, आंबेडकर झोपडपट्टी या भागात सुरू आहे. हे अड्डे हे कायमचे बंद का होत नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मालवणी-मालाडमध्ये विषारी गावठी दारू पिल्यामुळे १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडूनदेखील अद्याप शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये जागोजागी हातभट्टी धंदे जोरात सुरू आहेत.
येथील आंबेडकरनगर भागात कित्येक वर्षांपासून हातभट्टीची विक्री केली जात आहे. हा अड्डा रस्त्यालगत असल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना उग्र वासाचा आणि इतर त्रास होतो. या भागात नेहमीच दारूड्या व्यक्तींचा राबता असतो. त्यांमध्ये काही अल्पवयीन मुलेदेखील असतात. अनेक वेळा या ठिकाणी भांडण, हाणामारीचे प्रकार घडत असतात. विजयप्रभा सोसायटी भागातही अनेक वर्षांपासून दारूचे अड्डे सुरू आहेत. लपूनछपून ओळखीच्या लोकांना दारूविक्री केली जाते. विठ्ठलनगर झोपडपट्टी भागात देखील हातभट्टी दारूअड्डे सुरू आहेत. पोलीस अनभिज्ञता दाखवीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिसांचा वचक नसल्याने राजरोस दारूधंदे
चिंचवड : पोलिसांचा वचक नसल्याने परिसरात राजरोसपणे अवैध दारूधंदे सुरू आहेत. झोपडपट्टी भागासह मुख्य रस्त्यावरही दारूविक्री होत आहे. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेतेही यात सक्रिय आहेत. आर्थिक हितसंबंधामुळे अशा धंद्यांना पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दळवीनगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन, वाल्हेकरवाडी, वेताळनगर भागात राजरोस गावठी दारू विकली जात आहे. या भागात रोजच गर्दी होत असते. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. कित्येकदा अशा दारूविक्रेत्यांकडे पोलीस येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र कारवाई करण्यास ते धजावत नाहीत.

Web Title: Political support to illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.