पोलीस चौकी उघडी; मध्यरात्रीच्या आत दुकाने बंद
By Admin | Updated: November 3, 2015 03:33 IST2015-11-03T03:33:34+5:302015-11-03T03:33:34+5:30
बीट मार्शलची वाहने पोलीस चौकीसमोर, पोलीस चौकीलाही टाळे याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ

पोलीस चौकी उघडी; मध्यरात्रीच्या आत दुकाने बंद
पिंपरी : बीट मार्शलची वाहने पोलीस चौकीसमोर, पोलीस चौकीलाही टाळे याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळे सौदागर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी, तसेच वाकड, हिंजवडीच्या पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुधारणा घडून आल्याचे दिसून आले. रात्री ११ वाजताच टाळे लागणारी पोलीस चौकी रात्रभर खुली राहू लागली. तसेच मध्यरात्रीपर्यंत खुल्या राहणाऱ्या टपऱ्या, हॉटेलांना बारा वाजताच टाळे लागले.
पिंपळे सौदागर आणि वाकड, हिंजवडी परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि टपऱ्या सुरू ठेवल्या जात असल्याचे वास्तव लोकमत टीमने केलेल्या पाहणीत आढळून आले. रात्री तरुण, तरुणींचे घोळके ठिकठिकाणी चहा, नाष्ट्याच्या टपऱ्यांवर, हॉटेलवर दिसून येतात. शहराच्या अन्य भागात पोलीस पानटपरीसुद्धा रात्री बारानंतर सुरू ठेवू देत नाहीत. पिंपळे सौदागर आणि वाकड, हिंजवडी मात्र त्यास अपवाद असल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस यंत्रणा सजग करण्यात आली. पिंपळे सौदागर भागात पोलीस चौकीसमोर बीट मार्शलची वाहने उभी करून इतरत्र गायब झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी समज दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केलेली खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांना तंबी दिली असल्याने रविवारी रात्री बीट मार्शलच्या फेऱ्या दिसून आल्या. लोकमत बातमीच्या प्रभावाने एका दिवसात पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी भागाचे चित्र पालटले आहे. (प्रतिनिधी)