क्रीडापटूंना आता बॅँक खात्याची सक्ती
By Admin | Updated: July 22, 2015 03:08 IST2015-07-22T03:08:44+5:302015-07-22T03:08:44+5:30
शालेय क्रीडा स्पर्धांना पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. शाळा आणि महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड जमा करण्याची

क्रीडापटूंना आता बॅँक खात्याची सक्ती
पिंपरी : शालेय क्रीडा स्पर्धांना पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. शाळा आणि महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड जमा करण्याची सक्तीने सुरुवात केली आहे. आता क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी-खेळाडूंना बॅँक खात्याचा तपशील द्यावा लागणार आहे. क्रीडा शिष्यवृत्ती थेट खेळाडूंच्या खात्यात जमा करण्याचे कारण देत शासनाच्या सोयीसाठी ही माहिती घेतली जात आहे. यासाठी पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना बॅँक खाते उघडण्याची कसरत करावी लागणार आहे.
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेतर्फे दर वर्षी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यंदा विविध खेळ प्रकाराच्या ८७ स्पर्धा होणार आहेत. त्यास पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. यामध्ये सुमारे साडेतीनशे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा सहा गटांमध्ये स्पर्धा होते. शहर, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय अशा पातळीवर स्पर्धा होते. राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंना महापालिका, राज्य आणि केंद्र शासनाची क्रीडा शिष्यवृत्ती मिळते. त्याचबरोबर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ क्रीडा गुणांचा लाभ मिळतो.
या संदर्भात पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी सांगितले, ‘‘शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधारकार्डची नोंदणी केली आहे. राज्य आणि राष्ट्रीय शालेय खेळाडूंना आता बॅँक तपशील द्यावा लागणार आहे. संबंधित खेळाडूंच्या ओळखपत्राच्या मागील बाजूस ही माहिती द्यावयाची आहे. शासनाची शिष्यवृत्ती आॅनलाइन देण्याची प्रयत्न आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्याच्या बॅँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना शिष्यवृत्तीसाठी प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही.’’
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ मिळावा यासाठी ३१ मार्चपूर्वी शाळांनी प्रस्ताव पाठवावा. यासाठी १ जून २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१६ या कालावधीतील स्पर्धा ग्राह्य धरल्या जातील.(प्रतिनिधी)