वीज कोसळल्यामुळे झाड झाले जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:57 IST2018-10-01T23:56:44+5:302018-10-01T23:57:26+5:30
रुपीनगर : घरगुती वापराच्या वीजमीटरसह सुरक्षा भिंतीची पडझड होऊन झाले नुकसान

वीज कोसळल्यामुळे झाड झाले जमीनदोस्त
तळवडे : रुपीनगर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून झाड पडले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही; पण आर्थिक नुकसान झाले. रुपीनगर परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज कडाडली आणि क्षणात हभप किसनमहाराज भालेकर यांच्या घरासमोरील गुलमोहराच्या महाकाय वृक्षाने जमिनीवर अंग टाकले. यामुळे भालेकर यांच्या घरासमोरील कंपाऊडची भिंत आणि लोखंडी गेट झाडासोबत भुईसपाट झाले.
तसेच रस्त्याच्या कडेने असलेल्या खांबावरील वीजवाहक तारांवर झाड कोसळल्याबरोबर सिमेंटचा खांब तुटला आणि परिसरातील वीज गायब झाली. या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते़ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात़ लहान मुलेही रस्त्यावरच खेळतात़ पावसाचे वातावरण असल्यामुळे सुदैवाने लहान मुले रस्त्यावर खेळत नव्हती, रस्त्यावर कोणतेही वाहन आणि पादचारी नसल्यामुळे जीवितहानी झाली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. नगरसेवक पंकज भालेकर यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाचे जवान, महावितरण कर्मचारी व उद्यान विभागाच्या कर्मचाºयांना पाचारण केले.
रुपीनगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी महावितरण कंपनीकडे वारंवार मागणी केली; परंतु निधीअभावी भूमिगत केबलचे काम करणे शक्य नसल्याची सबब महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे़ नागरिकांच्या जीविताचा व सुविधेचा विचार करून ही कामे त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात उर्वरित भूमिगत केबलची कामे करण्यात यावीत. प्रशासनाने त्यासाठी कार्यवाही केली पाहिजे.
- पंकज भालेकर, नगरसेवक