- अमृता दातीर-जोशीसांगवी : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगवी फाटा येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपुलाखालील परिसरात पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून येथे विरंगुळा केंद्र आणि क्रीडा प्रकल्प साकारला. मात्र, या प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटनाला राजकीय नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आल्याने विधायक उपक्रमाच्या स्वागताला विनाकारण गालबोट लागले.हा प्रकल्प सांगवी परिसराची शान वाढवणारा आहे. शहराच्या औद्योगिक प्रगतीची आणि नागरी विकासाची साक्ष देणारे भव्य भित्तिशिल्प आणि आबालवृद्धांसाठी उभारलेली विविध आरोग्य साधने यामुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये उड्डाणपुलाखालील अरुंद जागेचा कल्पकतेने वापर करण्यात आला असून, येथे आता केवळ सौंदर्यच नाही, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी उत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. सृजनशील कलाकारांनी साकारलेल्या भित्तिशिल्पातून ‘विकासाची दिशा, पुढच्या पिढीसाठी आशा’ हा संदेशही दिला आहे. वास्तुविशारद श्रुती शहा यांच्या कल्पकतेची यास जोड आहे.या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कट्टा, वॉकिंग ट्रॅक आणि बसण्याची सोय उपलब्ध आहे, तर व्यायामप्रेमींसाठी आधुनिक ‘ओपन जिम’ आणि योगासने व हास्य क्लबसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आली आहे. लहान मुले आणि तरुणाईच्या आवडीचा विचार करून येथे बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि क्रिकेटसाठी स्वतंत्र सुविधांसह साहसी ‘क्लाइंबिंग वॉल’चे आकर्षण साकारले आहे. या प्रकल्पात सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि वाहनतळाची व्यवस्था केली आहे. झालं गेलं विसरून वेगळेपण जपणारा हा कला आणि क्रीडा प्रकल्प आता नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने खुला करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.प्रशासकीय समन्वयाचा अभाव, लोकप्रतिनिधी अनभिज्ञबहुप्रतीक्षित असणाऱ्या प्रकल्पांचे लोकार्पण होणार हे कळताच उत्साहाने थांबलेले ज्येष्ठ नागरिक अखेर कंटाळून निघून गेले. स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ होते, तर प्रशासनाने मात्र सन्माननीय मान्यवरांपर्यंत कार्यक्रमाचा निरोप पोहोच केल्याचे स्पष्ट केले. एकूणच काय तर यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आणि लोकार्पण कार्यक्रम गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर आली.
Web Summary : Pimpri-Chinchwad's entrance got a makeover with a recreation and sports complex. However, the formal inauguration failed due to a lack of coordination between political leaders and administration. The project boasts murals, health equipment and sports facilities.
Web Summary : पिंपरी-चिंचवड का प्रवेश द्वार मनोरंजन और खेल परिसर से सुंदर बनाया गया, लेकिन राजनीतिक नेताओं और प्रशासन के बीच समन्वय की कमी के कारण औपचारिक उद्घाटन विफल रहा। परियोजना में भित्ति चित्र, स्वास्थ्य उपकरण और खेल सुविधाएँ हैं।