पिंपळे गुरव : सांगवीतील शुभंकर संजीव नायडू यांची नुकतीच भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. सहा सप्टेंबरला पार पडलेल्या दीक्षान्त संचालन सोहळ्यात कुटुंबीयांसह सहभागी झाले होते.
शुभंकर संजीव नायडू याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील भारती विद्या भवन येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर भोसला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले. पुण्याच्या गरवारे कॉलेजमधून पदवी पूर्ण करत असताना एनसीसीमध्ये सहभाग घेऊन शुभंकर यांची २०२० मध्ये २६ जानेवारीच्या दिल्लीच्या विजयपथ परेडमध्ये महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली होती. त्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बारावीत असताना जिल्हास्तरीय बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून नागपूरचे प्रतिनिधित्व केले.
बालपणापासून सैन्याचे आकर्षण, नातेवाईकांकडून मिळाले प्रोत्साहन
शुभंकर यांच्या आजोबांचे घर पुण्याच्या एनडीएच्या खडकवासलाजवळ होते. तिकडे दर शनिवार, रविवार शुभंकर आजी-आजोबांकडे जायचा, तेव्हा आजोबा त्यांना एनडीएमध्ये फिरायला घेऊन जायचे. तेव्हापासून तेथील शिस्तबद्ध वातावरण आणि कॅटेट्सना पाहून शुभंकर यांना देशसेवा करण्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी इयत्ता सहावीत असतानाच भारतीय सेनेमध्ये अधिकारी व्हायचे ठरविले होते. शुभंकरचे वडील संजीव राजू नायडू खडकी येथील ॲम्युनिशन फॅक्टरी येथे नोकरीत कार्यरत आहे. ॲम्युनिशन फॅक्टरीमधील युद्धसाहित्यांचे प्रदर्शन भरवले गेले की त्यांचे वडील त्यांना प्रदर्शनासाठी घेऊन जात असे. शुभंकरची आई नीलिमा नायडू या सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटी येथे शाळेत शिक्षिका आहेत.
शुभंकरला लहानपणापासूनच भारतीय सैन्यदलाबाबत आवड व उत्सुकता होती. त्याने यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्याच्या सैन्यदलातील निवडीमुळे कुटुंबीयांना आनंद झाला आहे. सैन्य दलात चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य पार पाडेल याचा आम्हाला विश्वास आहे. - नीलिमा नायडू, शुभंकरची आई