पिंपरी : महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची नेत्यांच्या घरी आणि पक्ष कार्यालयात अक्षरशः धावपळ सुरू झाली असून, गेल्या काही दिवसांत या हालचालींना विशेष वेग आला आहे. त्यात वरचेवर वरिष्ठ नेत्यांच्या शहरात फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी, तर पक्ष कार्यालयांमध्ये सतत सुरू असलेली बैठकांचे सत्र असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर पक्षांमध्ये आतील स्पर्धा, गटा-तटांचे गणित, सोशल मीडिया टीम्सची हालचाल आणि भेटीगाठी हे सगळे आता एकाच वेळी सुरू असल्याचे दिसत आहे. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी भूमिपूजनांचे कार्यक्रम, छोट्या पातळीवरील सभा, स्थानिक प्रश्नांवरील तत्पर प्रतिक्रिया, तसेच प्रभावी व्यक्तींना भेट देण्याची मालिका सुरू केली आहे.
दरम्यान, इच्छुकांनी सोशल मीडियावरही उपस्थिती प्रचंड वाढवली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) वरून दैनंदिन पोस्ट, जनसंपर्क दौऱ्याचे फोटो, लाइव्ह व्हिडीओ, रील्स, ‘मी पुन्हा येतोय’, ‘माझा प्रभाग – माझी जबाबदारी’ अशा टॅगलाईन्ससह तयार केलेले कॅम्पेन दिसू लागले आहेत. काहींनी बूस्टेड पोस्ट, टार्गेटेड प्रमोशन आणि वर्क रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात आपला प्रचार आक्रमकपणे पुढे नेण्यास सुरुवात केली आहे.
‘दिसणं म्हणजे जिंकणं’वर इच्छुकांचा जोर...
येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सर्व पक्षांमध्ये तिकिटांचे गणित अंतिम टप्प्यात आले आहे. तिकिटाच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी गट-प्रमुख, जिल्हा पदाधिकारी आणि प्रभागातील प्रभावशाली कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला असून, अंतर्गत लॉबिंग तीव्र झाल्याचे दिसत आहे. काही प्रभागांमध्ये एकाच जागेसाठी पाच ते सात इच्छुक स्पर्धेत असल्याने पक्षांतर्गत समन्वयकांवर ताण वाढला आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतशी ‘दिसणं म्हणजे जिंकणं’ हे सूत्र वापरत सर्व इच्छुक प्रचारात जोर लावताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांत पक्षस्तरावर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण आणखी चुरशीचे होणार, यात शंका नाही.
Web Summary : Pimpri's political scene heats up as aspirants vie for party tickets. Intense lobbying, social media campaigns, and leader visits mark the pre-election rush, with candidates focusing on visibility to win.
Web Summary : पिंपरी का राजनीतिक माहौल पार्टी टिकटों के लिए उम्मीदवारों की होड़ के साथ गर्म हो गया है। तीव्र लॉबिंग, सोशल मीडिया अभियान और नेता यात्राएं चुनाव पूर्व भागदौड़ को दर्शाती हैं, जिसमें उम्मीदवार जीतने के लिए दृश्यता पर ध्यान केंद्रित कर रहे हैं।