पिंपरी : महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल बुधा ढवळा दाभाडे यांनी महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे आली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी भांडारपाल दाभाडे यांना नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा मागितला आहे.
भांडारपाल दाभाडे यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार निगार दस्तगीर आतार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. वारंवार विचारणा करूनही त्यांनी नोकरी लावली नाही. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, मूळ शैक्षणिक कागदपत्रेही परत केलेली नाहीत.
ही बाब अत्यंत गंभीर असून, कार्यालयीन शिस्तीचा व नियमाचा भंग करणारी आहे. या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम तीनचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ५६ व महाराष्ट्र शिस्तभंग विषयक कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून दाभाडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.