- सचिन ठाकर
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील मौजे ब्राह्मणोली गावात ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर एका शिळेवर स्मृती शिलालेख आढळला आहे. शिलालेख कोरीव असून, दोन ओळींचा देवनागरी लिपीत मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्षे उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन अक्षरे पुसट झाली आहेत. या शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी केले. शिलालेखावरील मजकुरानुसार तो एका काळे पाटलांचा स्मृती शिलालेख असल्याचे समजते.
शिलालेखावर ‘भिकाजी पा. काळा, शके १७११ पौ.मास’ असा मजकूर लिहिलेला आहे. त्याचा अर्थ, शालिवाहन शकाच्या १७११ व्या वर्षी सौम्य नाम संवत्सरात पौष महिन्यात म्हणजेच सन १७८९ व्या वर्षी जानेवारी महिन्यात भिकाजी काळा (काळे) पाटील यांची स्मारक शिळा किंवा समाधी तयार केली किंवा त्या दिवशी त्यांचा मृत्यूही झालेला असू शकतो? शिळेवर सूर्य, चंद्र कोरलेलेया स्मारक शिळेच्या वरील बाजूला सूर्य, चंद्र दाखवलेले आहेत. सूर्य, चंद्र याचा अर्थ ‘यावत चन्द्रो दिवाकरो विलसत स्तावत सभृज्ज्यमते’. म्हणजेच जोपर्यंत या पृथ्वीतलावर सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत या स्मारक शिळेची, त्या व्यक्तीच्या नावाची व कार्याची कीर्ती चिरकाळ टिकून राहील. शिलालेखाच्या सुरुवातीला व शेवटी उभे दोन दंड दिलेले आहेत. शिलालेखावरील मजकुरावरून काय अंदाज येतो?
शिलालेखात आलेले नाव भिकाजी काळे हे गावाचे पाटील असावेत. त्यांच्या स्मरणार्थ हे पाषाण शिल्पस्मारक उभे केलेले आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. मध्ययुगीन काळातील हा अत्यंत दुर्मिळ स्मारक शिळा प्रकार असून, या शिलालेखाच्या माध्यमातून व्यक्तीचे महत्त्वही कळते. दुर्दैवाने भिकाजी काळे पाटील या व्यक्तीबद्दल इतर काहीही माहिती नाही.
पाटील/पाटीळ म्हणजे काय?
प्रत्येक गावाला पाटील असतो. पाटील हा काही कोणी राजाने दिलेला हुद्दा नसावा. सर्व अधिकार गावपाटलाला असून, तो गावातला राजाचा प्रतिनिधी होता. गाव वसवणारा पुढारी गावपाटील झाला. ज्यांनी गाव वसवला त्या मिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख होते. जो गावची बाजू सावरून व उचलून धरणारा होता. गावाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला आणि सरकारी काम, बंदोबस्त करणारा म्हणून सरकारला पटला. तो गावचा पाटील केला. पाटलांना गावापुरते मुलकी, दिवाणी, फौजदारी वगैरे कुल अधिकार असत.