भोसरी : ‘हर्र हर्रररर महादेव’चा जयघोष आणि ‘भिर्ररऽऽ’ अशा आरोळ्यांमध्ये भोसरीतील बैलगाडा शर्यतींना मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चऱ्होलीतील अवधूत बबलू तापकीर यांच्या बैलगाड्याने फायनलचा, तर चऱ्होली येथीलच कुणाल कृष्णा तापकीर यांच्या बैलगाड्याने फळीफोडचा मान पटकावला. शर्यतीत चऱ्होलीने वर्चस्व कायम राखत दबदबा निर्माण केला आहे.भोसरी येथील भैरवनाथ मंदिर उत्सवाला मंगळवार, दि. १५ एप्रिल रोजी प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी रोमांच उभा करणारा बैलगाडा शर्यतीचा थरार भोसरीकरांनी अनुभवला. सुमारे २२२ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांकाचे विजेते अवधूत तापकीर यांच्या बैलगाड्यास ग्रामस्थांच्या वतीने एक लाख ११ हजार, तर फळीफोडसाठी कुणाल तापकीर यांना ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे विजेते नरहरी सदाशिव बालघरे यांना ९१ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाचे विजेते मयूर ज्ञानेश्वर लोहार (तळेगाव) यांना ६१ हजार, तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते समीर गुलाब जाधव यांना ४१ हजार रुपये रोख रक्कम, दुचाकी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पाचवा क्रमांक : साईराज माऊली दाभाडे यांना २१ हजार रुपये, सहावा क्रमांक : कांतीलाल रामभाऊ साकोरे यांना ११ हजार रुपये, सातवा क्रमांक : शिवराज सुनील थोरवे यांना १० हजार रुपये असे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षिसांची उर्वरित रक्कम सहभागी बैलगाडा मालकांना विभागून देण्यात आली. मंगळवारच्या शर्यतीसाठी ५ लाख ५३ हजार रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक दत्ता गव्हाणे, रवी लांडगे, उत्सव कमिटीचे भानुदास दादा फुगे, पैलवान किसनराव शिंदे उपस्थित होते. माऊली पिंगळे व साहेबराव आढळराव यांनी समालोचन केले. रात्री सात वाजता बापूजीबुवा चौक येथून ढोल, लेझीम पथकासह वाजत-गाजत ‘श्रीं’ची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भिर्ररऽऽऽ भोसरीच्या बैलगाडा शर्यतीत चऱ्होलीचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:17 IST