‘पीए’च्या गैरहजेरीने ‘स्थायी’ तहकूब
By Admin | Updated: August 31, 2016 01:05 IST2016-08-31T01:05:37+5:302016-08-31T01:05:37+5:30
आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार असलेल्या स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी दर वर्षी स्पर्धा लागते. टक्केवारीचा फायदा सदस्यांना मिळत असल्याने समितीची

‘पीए’च्या गैरहजेरीने ‘स्थायी’ तहकूब
पिंपरी : आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार असलेल्या स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी दर वर्षी स्पर्धा लागते. टक्केवारीचा फायदा सदस्यांना मिळत असल्याने समितीची साप्ताहिक सभा या सदस्यांच्या दृष्टीने जणू काही आठवडा बाजारच असते. एखाद दुसरा अपवाद वगळता अध्यक्षांची अनुपस्थिती असेल, तरीही अन्य कोणत्या तरी सदस्याच्या अध्यक्षतेखाली सभा होतेच,सदस्यही आवर्जून हजेरी लावतात. या वेळी मात्र स्थायी समितीतील स्वीय सहायक रजेवर असल्याने चक्क स्थायी समिती सदस्यांनीच सभेकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. मात्र, गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्याचे काही सदस्यांनी सांगितले.
स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक पुष्कराज धाडगे यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून आक्षेप नोंदवले जात आहेत. अनेक वर्षांपासून धाडगे एकाच ठिकाणी कसे? त्यांची आतापर्यंत बदली का झाली नाही? अशा तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. काहींनी माहिती अधिकारांतर्गत प्रशासनाकडून धाडगे यांची माहिती मागवली. विरोधी पक्षाचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे माहिती अधिकारातील अर्ज याचा ससेमिरा मागे लागल्याने धाडगे रजेवर गेल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
स्वीय सहायकपदावर धाडगे वर्षानुवर्षे आहेत. ते नसतील, तर सभेला उपस्थित राहून काय फायदा? असा विचार केलेल्या काही सदस्यांनी चक्क सभेला दांडी मारली.
(प्रतिनिधी)