पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:10 IST2018-10-29T17:08:07+5:302018-10-29T17:10:37+5:30
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, पाटील यांची 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी पालिकेत बदली झाली होती. महिन्याभरानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
पिंपरी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली होती. परंतु, हांगे पिंपरी पालिकेत जास्त काळ टिकले नाहीत. केवळ चार महिन्यातच त्यांची तडकाफडकी बदली झाली. 1 जून 2017 रोजी पिंपरी - चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झालेल्या हांगे यांची 25 ऑक्टोबर 2017 रोजी तडकाफडकी बदली झाली.
तेव्हापासून पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. दरम्यान, सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला होता. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर 29 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची पिंपरी पालिकेत बदली झाली होती. महिन्याभरानंतर त्यांनी आज अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. सहायक प्रवीण अष्टीकर यांच्याकडील अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार निरस्त करण्यात आला आहे.