फलक हॉटेलचा... आतमध्ये दारूविक्री

By Admin | Updated: July 26, 2015 01:41 IST2015-07-26T01:41:54+5:302015-07-26T01:41:54+5:30

शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली असून, ठिकठिकाणी पोलिसांच्या कृपेने अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदा आणि विनापरवाना दारूविक्री सुरू आहे.

In the panels of the hotel ... sell liquor inside | फलक हॉटेलचा... आतमध्ये दारूविक्री

फलक हॉटेलचा... आतमध्ये दारूविक्री

पिंपळे गुरव : शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली असून, ठिकठिकाणी पोलिसांच्या कृपेने अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदा आणि विनापरवाना दारूविक्री सुरू आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने पोलीसपथक कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगवी, पिंपळे गुरव परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना दारूविक्री जोरात आहे. दापोडी, जुनी सांगवी व पिंपळे गुरवमध्ये परवानाधारक दारूविक्रीची दुकाने आहेत. मात्र खरेदी केलेली दारूपिण्यासाठी मोकळी वा अडगळीची जागा पाहून तळीरामांची मैफल जमते. अशा मोकळ्या जागेजवळील रहिवाशांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. दारूविक्री परवाना काढण्यासाठी लागणारी अनेक कागदपत्रे, अनधिकृत बांधकाम, सोसायटीचे संमतीपत्र यामुळे व्यावसायिक सध्या शॉर्टकटचा अवलंब करताना दिसत आहेत. यामध्ये हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस यांचा फायदा अधिक होत आहे. परिसरात विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या हॉटेलांची संख्या मोठी आहे.
कृष्णा चौक ते काटेपुरम् चौक या रस्त्यावर महापालिकेच्या आरक्षित जागेवर नाट्यगृह उभारणीचे काम सुरू आहे. याच जागेतून नंदनवन कॉलनी व गुरुदत्त कॉलनीसाठी रस्ता आहे. त्यामुळे रात्री महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात वाहनचालक व रिक्षाचालक आडोशाचा फायदा घेऊन मोकळ्या जागेत रात्री दारू पिणारी टोळकी दिसतात. हे तळीराम दारू पिऊन त्याच ठिकाणी बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या व खरकटे टाकतात. त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. ही टोळकी दिसली, तरी पोलीस कारवाई करीत नाहीत. (वार्ताहर)


राजकारण्यांच्या नातेवाइकांची हॉटेल्स
-सांगवी, पिंपळे गुरव परिसरात २५ हून अधिक हॉटेल आहेत. एकाही हॉटेलला परमिट रूमचा फलक नाही. राजरोसपणे दारूपिण्यास परवानगी दिली जाते. काही हॉटेलमध्ये नाममात्र शुल्क घेऊन दारू पिण्यास परवानगी दिली जाते. पुढे वाईन शॉप आणि मागे दारूविक्री एखाद्या वेळी कारवाई केली, तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दारूविक्री पूर्ववत होते. कारण अनेक हॉटेल राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईस पोलीस टाळाटाळ करतात.

Web Title: In the panels of the hotel ... sell liquor inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.