पिंपरी-चिंचवड शहरात अतिउत्साहामुळे तरुणाचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:01 IST2017-07-30T23:00:24+5:302017-07-30T23:01:41+5:30
मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना पाय घसरून कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात शनिवारी तरुण बुडून बेपत्ता झाला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात अतिउत्साहामुळे तरुणाचा गेला जीव
तळेगाव दाभाडे, दि. 30 - मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना पाय घसरून कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात शनिवारी तरुण बुडून बेपत्ता झाला होता. रविवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीमध्ये अतुल दशरथ पाटील (वय २५, रा. ढोलीगाव, ता. पारोळा, जि. जळगाव) मृतदेह सापडला. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी येथील अभियांत्रिकी शाखेचे ९ विद्यार्थी वर्षाविहारासाठी शनिवारी कुंडमळा (इंदोरी) येथे आले होते. अतुल पाटील हा रांजणखळगे पाहत असताना पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. एनडीआरएफच्या जवानांनी शनिवारी सुरू केलेली शोधमोहीम अंधारामुळे थांबविली होती. रविवारी सकाळी बोट आणि पाणबुडीच्या साहाय्याने एनडीआरएफच्या जवानांनी ही शोधमोहीम पुन्हा सुरू केली. अतुलच्या निधनाची वार्ता आकुर्डी परिसरात पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत नाही.
अतिउत्साह नडला
इंद्रायणी नदीपात्रात कुंडमळा येथे रांजणखळगे आहेत. त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरुण विविध कसरती करतात. शनिवारीही अशाच प्रकारे काही जण उड्या मारत होते, तर काही जण फोटो काढत होते. अतुल नदीत उडी मारतानाचे छायाचित्र त्याच्या मित्रांनी टिपले. ही उडी मारतानाच त्याचा तोल गेला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. अतुलसाठी अतिउत्साह जीवघेणा ठरला.