नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

By Admin | Updated: July 10, 2015 01:40 IST2015-07-10T01:40:42+5:302015-07-10T01:40:42+5:30

खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल्समध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Opportunities for new faces? | नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

कामशेत : खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, आरपीआय भारिप या पक्षाचा परिवर्तन पॅनल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांचा दिलीप टाटिया सहकारी पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. दोन्ही पॅनल्सनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मनसेही या निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनल्समध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलने माऊलीनगर येथे मुलाखती घेतल्या. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे, राजाराम शिंदे, शंकर शिंदे, अशोक गायकवाड, प्रकाश गायकवाड, इंदरमल गदिया, बाळासाहेब गोरे
यांनी मुलाखती घेतल्या. १००हून अधिक इच्छुकांनी मुलाखतीत उमेदवारी मागितली.
तर, गणेश मंगल कार्यालयात दिलीप टाटिया सहकारी पॅनलसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, आनंद टाटिया, राष्ट्रवादीचे तानाजी दाभाडे, करण ओसवाल, विलास भटेवरा, पृथ्वीराज गदिया, महेश शेट्टी, विष्णू गायखे, सुरेश वाघवले यांनी मुलाखती घेतल्या. इच्छुकांच्या समर्थकांच्या उपस्थितीने या वेळी गर्दी झाली होती. सुमारे ७० जणांनी या वेळी उमेदवारी मागितली.
नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी परिवर्तनाच्या विद्यमान सदस्यांनी उमेदवारी मागितली नाही. परिवर्तनची सत्ता पलटून सत्ता मिळविण्यासाठी टाटिया पॅनलच्याही सदस्यांनी नव्या चेहऱ्यांना संधीसाठी उमेदवारी मागितली नाही. राज्यात सेना भाजपा व आरपीआयची महायुती असल्याने यंदा प्रथमच आरपीआय टाटिया पॅनलला सोडून परिवर्तनमध्ये डेरेदाखल झाला आहे. तर, टाटिया पॅनलला एसआरपीची साथ जोडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बिपीन बाफना यांनी तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी केली.
स्वबळावर लढणाऱ्या उमेदवारांची तयारी आणि तिरंगी लढतीमुळे या वेळची निवडणूक रंगतदार होण्याची अपेक्षा जाणकार व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Opportunities for new faces?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.