पिंपरी : ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या संपर्कात असणाऱ्या संशयिताला पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताचे थेट दुबईत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकासोबत कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. जेष्ठ नागरिकाची दोन कोटी ५२ लाख ९६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली होती.
बाळासाहेब सखाराम चौरे (३२, रा. जिवाची वाडी, ता. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने फेसबुकच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकास ऑनलाइन ट्रेडिंगबाबत लिंक पाठवून व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले. एचएसबीसी ट्रेडिंग नावाचे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असे आमिष दाखवले. पैसे भरण्यास त्यांना भाग पाडले. परंतु, गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी ब्रोकरेज फी, हाय ट्रान्झॅक्शन्स फी, सिक्युरिटी डिपॉझिट, थर्ड पार्टी ट्रांजेक्शन विड्रॉल प्लॅटफॉर्म असे वेगवेगळे चार्जेस भरण्यास भाग पाडून दोन कोटी ५२ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे परत मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकाने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सायबर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, सागर पोमण, वैभव पाटील, विद्या पाटील यांचे पथक तयार केले. वापरण्यात आलेले बँक खात्याचा तपास केला. हे बँक खाते बीड जिल्ह्यातील असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. खातेधारकाला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर संबंधित खाते वापरत असलेल्या बाळासाहेब चौरे याला केज तालुक्यातील जीवाची वाडी येथून अटक केली. त्याचे दुबई कनेक्शन समोर आले. तेथे राहत असलेल्या गणेश काळे आणि पाकिस्तानी नागरिकाशी संगणमत करून बँक खाते त्यांना कमिशनच्या आधारावर देत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. बाळासाहेब चौरे हा दुबई, नेपाळच्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.
बँक खाते दिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
गणेश काळे याने दुबई येथून स्वत: व त्याच्या साथीदारांमार्फत महाराष्ट्रातील व इतर ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात बँक खाते प्राप्त करून त्याचा फसवणुकीची रक्कम वर्ग करण्यासाठी वापर केला आहे. गणेश काळे याला खाते दिलेल्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे.