शहरात अकरापैकी एकाच गुन्ह्याचा छडा
By Admin | Updated: November 22, 2015 03:35 IST2015-11-22T03:35:55+5:302015-11-22T03:35:55+5:30
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी फक्त एकच गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला

शहरात अकरापैकी एकाच गुन्ह्याचा छडा
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी फक्त एकच गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिवसाढवळ्या पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला जात असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खाकीचा धाक नसल्यामुळेच सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असून, यामुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
शहरातील असा एकही रस्ता नाही, ज्या ठिकाणाहून पादचारी महिलेची सोनसाखळी चोरीला गेली नसेल. प्रत्येक रस्त्यावर सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.काही ठिकाणी तर घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील, तर काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असतानाही सोनसाखळी चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत.
तीन महिन्यांत पिंपरी, भोसरी, चिंचवड, निगडी, भोसरी औद्योगिक परिसर या ठिकाणांहून तब्बल दहा लाखांच्या किमतीच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, भोसरी औद्योगिक परिसरात दोन, तर पिंपरी येथे एका ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडली. यामध्ये सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीच्या सोनसाखळी चोरीला गेल्या आहेत. पोलिसांना सहा गुन्ह्यांपैकी निगडीतील तीनपैकी एकच गुन्हा शोधण्यात यश आले असून, इतर गुन्ह्यांचा तपासही अद्याप सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात चिंचवड येथेच चोरीची एक घटना घडली असून, सव्वालाखांची सोनसाखळी चोरीला गेली आहे. तर आॅक्टोबर महिन्यातही पिंपरी, निगडी, भोसरी व भोसरी औद्योगिक परिसर येथे सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये अडीच लाखांची सोनसाखळी चोरीला गेली आहे.(प्रतिनिधी)