‘वायसीएम’मधील अधिकाऱ्यांची झाडाझडती
By Admin | Updated: August 6, 2015 03:33 IST2015-08-06T03:33:08+5:302015-08-06T03:33:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विदारक चित्रण ‘लोकमत’मधील ‘पत्रकारिता परमो धर्म’ यातून मांडण्यात आले

‘वायसीएम’मधील अधिकाऱ्यांची झाडाझडती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विदारक चित्रण ‘लोकमत’मधील ‘पत्रकारिता परमो धर्म’ यातून मांडण्यात आले. त्याची गंभीर दखल घेऊन उपमहापौर, पक्षनेत्या, स्थायी समिती अध्यक्षांनी रुग्णालयाची भेट घेऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील गैरसोई, रुग्णांची होणारी हेळसांड याबाबत झाडाझडती घेतली. तीन दिवसांत तातडीने प्रश्न सुटले पाहिजेत, अशा आशयाचे पत्रही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले.
‘लोकमत’च्या वतीने ‘पत्रकारिता परमो धर्म’ हा उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत चव्हाण रुग्णालयाची ‘लोकमत’च्या टीमने पाहणी करून हॅलो पिंपरी-चिंचवड या पुरवणीत ४ आॅगस्टच्या अंकात तेथील चित्र मांडले होते. वशिल्याने मिळणारा आयसीयू, रुग्णांची हेळसांड, पार्किंगमध्ये होणाऱ्या चोऱ्या, सुरक्षा यंत्रणा कुचकामी, प्रसूतिकक्षाकडे दुर्लक्ष, रुग्णांच्या तुलनेत कमी असलेली लिफ्टची सुविधा, तातडीक सेवेकडे होणारे दुर्लक्ष, अधिकारी डॉक्टर आणि परिचारिकांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष यावर लक्ष वेधले होते. परिणामकारक, प्रभावी छायाचित्रांचे पुरावे देऊन वायसीएमचा कारभार किती ढिसाळ आहे, हे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले होते.
याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी शहराध्यक्ष, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे यांनी दुपारी साडेचारला वायसीएमला भेट दिली. रुग्ण, डॉक्टर, प्रशासन, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच प्रसूतिविभाग, तातडीक सेवा देणाऱ्या वॉर्डालाही भेट दिली. कर्मचाऱ्यांची कमी असणारी संख्या, डॉक्टरांची कमतरता, रखडलेली कामे याविषयी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रसूति विभागातील सुरक्षेबाबत जागरूक असावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या.
तसेच अतिदक्षता विभागाचे रेकॉर्ड ठेवून प्रसूतीसाठी महिला बाहेर जाऊ नयेत, याची दक्षताही रुग्णालयातील लोकांनी घ्यायला हव्यात; तसेच तिसऱ्या आयसीयू कक्षाचे काम करावे, रुग्णांना चांगली सेवा द्यावी, रुग्णालयाचे नाव बदनाम होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी.(प्रतिनिधी)