नोट्स, पुस्तकाला सुटी; ऑडिओशी गट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:52 IST2019-02-23T23:52:15+5:302019-02-23T23:52:19+5:30
बदलती अभ्यासपद्धती : वेळेच्या कमतरतेमुळे शोधला शॉर्टकट, डिजिटलायझेशनमुळे शक्य

नोट्स, पुस्तकाला सुटी; ऑडिओशी गट्टी
- मंगेश पांडे
पिंपरी : सध्या विविध अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध होत असतानाही अनेक जण आॅडिओद्वारे (दृक्श्राव्य) अभ्यास करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरच अभ्यास करून परीक्षेस सामोरे जाऊन यशही संपादित करीत आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. दरम्यान, एखादी नोकरी लागल्यानंतर ती नोकरी करीत असतानाच पुढील शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, अशावेळी नोकरी आणि महाविद्यालयातील लेक्चर अटेंड करणे शक्य नसते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याकडे वेळेची कमतरता आहे. अशातही शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. नोकरीच्या व्यापात पुस्तक अथवा नोटस् वाचण्यासही वेळ नसतो. त्यामुळे सध्या अनेक जण आॅडिओद्वारे लेक्चर ऐकण्याचा पर्याय निवडतात. आॅडिओद्वारेच अभ्यास करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
डिजिटलच्या जमान्यात अशा पद्धतीने अभ्यास करणे अधिक सोपे झाले आहे. मोबाइलवर उपलब्ध इंटरनेटवरून संबंधित अभ्यासक्रमाची आॅडिओ क्लीप डाउनलोड केल्यानंतर कधीही अन् कुठेही हा आॅडिओ ऐकणे शक्य होते. सध्या अनेक जण याप्रकारे अभ्यास करण्यास प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी याप्रकारेच अभ्यास करून परीक्षेला सामोरे जात आहे.
नोकरी सांभाळून एखाद्या पदवीसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी मिळेल त्या वेळेत अभ्यास करण्यास प्राधान्य देत असतात. कॉलेजचे रोजचे तीन ते चार तासांचे लेक्चर्स अटेंड करणे त्यांना शक्य होत नाही. असे विद्यार्थी आॅडिओद्वारे अभ्यास करतात.
अनेक क्षेत्रातील कामकाज सध्या पेपरलेस होत आहे. दरम्यान, आता शिक्षणही डिजिटल पद्धतीने दिले जात आहे. पुस्तक अथवा नोटस् वाचण्याऐवजी आॅडिओ पद्धतीने लेक्चर ऐकून अभ्यास केला जात आहे. दरम्यान, अनेकांकडे अभ्यास करण्यासाठी वेळही नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आॅडिओ पद्धतीचा अभ्यास करण्याचा पर्याय फायदेशीर ठरत आहे.
विविध अभ्यासक्रमांच्या नोट्स अथवा पुस्तके उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे परीक्षेवेळी अडचण निर्माण होते. अशावेळी आॅडिओ ऐकने सोयीचे ठरते. इंटरनेटवर संबंधित विषय अथवा अभ्यासक्रमातील प्रश्न टाकला तरी काही क्षणातच आॅडिओ, व्हिडिओ उपलब्ध होत आहे.