पिंपरी : आरोग्य विभागाशी संबंधित असो की अन्य कोणत्या विभागाशी संबंधित तक्रार सारथीवर संपर्क साधला तरी कोणी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्येचे निरसन होत नाही, अशा स्थितीत महापालिका व्हॉट्सअॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींबाबत काहीच देणे घेणे नाही. अशा स्वरूपात महापालिकेचा कारभार आहे, त्यामुळे नागरिक हतबलता व्यक्त करू लागले आहेत.महापालिकेने सारथी हेल्पलाइन सुरू करून लोकाभिमुख प्रशासनाचा पायंडा घातला. सुरुवातीचे काही दिवस सारथी हेल्पलाइनचा नागरिकांना उपयोग झाला. नंतर मात्र सारथी नागरिकांच्या दृष्टीने कुचकामी ठरू लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीत जाणे शक्य होत नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारणेही अशक्य असते. अशा वेळी त्यांना सारथीसारख्या सुविधेची अत्यंत आवश्यकता भासते. महापालिकेने लोकाभिमुख प्रशासनांतर्गत अनेक घोषणा केल्या. नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारींचे निराकरण करता येईल. अशी घोषणा केली. तक्रार नोंदविण्याची यंत्रणा हायटेक असली तरी तक्रारींचे निराकरण करण्याबाबत अधिकाºयांचीच उदासीनता आहे.लोकशाही दिन उपक्रमाची आवश्यकतापूर्वी महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या उपक्रमाचे आयोजन केले जात होते. या उपक्रमात थेट तक्रारदार नागरिक उपस्थित राहात. तेथेच संबंधित अधिकाºयांकडून त्यांच्या समस्येचा निपटारा केला जात असे. अधिकाºयांनाही नागरिकांच्या समस्येचे मुदतीत निराकरण करणे भाग पडत असे. हा लोकशाहीदिनाचा उपक्रम बंद पडल्याने अधिकाºयांचे फावले आहे. जोपर्यंत कामाचा आढावा घेणारी यंत्रणा कार्यान्वीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांना असेच हताश आणि हतबल व्हावे लागणार आहे.
‘सारथी’कडून नाही तक्रारींची दखल, नागरिक हतबल, प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:57 IST