शहरात नाइटलाइफची धूम

By Admin | Updated: July 26, 2016 05:14 IST2016-07-26T05:14:13+5:302016-07-26T05:14:13+5:30

महानगरांमध्ये दुकाने, मॉल, चित्रपटगृह २४ तास सुरू ठेवण्यासंबंधीचा कायदा करण्याच्या तयारीत केंद्र शासन आहे. परदेशात ज्याप्रमाणे दिवस-रात्र दुकाने, मॉल सुरू राहतात, त्याप्रमाणे

Nightlife trips in the city | शहरात नाइटलाइफची धूम

शहरात नाइटलाइफची धूम

- संजय माने,  पिंपरी

महानगरांमध्ये दुकाने, मॉल, चित्रपटगृह २४ तास सुरू ठेवण्यासंबंधीचा कायदा करण्याच्या तयारीत केंद्र शासन आहे. परदेशात ज्याप्रमाणे दिवस-रात्र दुकाने, मॉल सुरू राहतात, त्याप्रमाणे मुंबईसारख्या महानगरांमध्ये नाइटलाइफचा अनुभव घेता येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे विकसित झालेल्या हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर परिसरात केंद्राचा नवा कायदा अस्तित्वात येण्याची वाट न पाहताच नाइटलाइफची धूम अनेक जण अनुभवत आहेत.
परदेशात जपान, तसेच थायलंडमध्ये ‘सेव्हन इलेव्हन’ नावाने असलेली दुकाने रात्रभर सुरू असतात. ३६५ दिवस ही दुकाने २४ तास खुली असतात. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, शीतपेय,कॉस्मेटिक्स व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू हव्या त्या वेळी खरेदी करता येतात. त्या ठिकाणी जवळच एटीएम केंद्र असते. वायफाय सुविधा उपलब्ध असते. अशाच प्रकारे भारतातील महानगरांमध्येही दुकाने, मॉल, चित्रपटगृह रात्रभर सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शहरातील पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी या भागात सद्य:स्थितीतही रात्रभर व्यवहार सुरू असल्याचे पाहावयास मिळते. वाकड मधील हुक्काबार रात्रभर सुरू असतात. पिंपळे सौदागरला पानटपऱ्या, तसेच काही हॉटेलांमध्ये रात्री कधीही हवे ते खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांतून सुटल्यानंतर रात्री दीड, दोन, तीनलाही नाष्टा हाऊसवर
सामोसा खाण्यासाठी तरुणाईची गर्दी दिसते. रात्री दुकानांच्या रोषणाईच्या झगमगाटात सिगारेटचे झुरके
मारणारी तरुणाई पाहावयास
मिळते. परदेशात सेव्हन इलेव्हन शॉपींमध्ये दैनंदिन आवश्यक अशा सर्व वस्तू मिळतात.

महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यातून कोणी या भागात नव्याने आले, तर त्याला जणू काही परदेशात आल्याचा भास होतो. आलिशान इमारती, रात्र झाली हे कळूनही येणार नाही, असा झगमगाट, हॉटेलांच्या आवारात मध्यरात्री दिसून येणारी गर्दी अशी परिस्थिती पिंपरी-चिंववडच्या काही भागात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्रात काम करणारे अभियंते व अन्य कामगार वर्ग आहे. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीचा परिसर म्हणून गणल्या गेलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची जीवनशैलीही तशीच आहे. आयटी कंपन्यांच्या मार्फत कामानिमित्त परदेशात विविध ठिकाणचे दौरे करून आलेल्या आयटीयन्सच्या जीवनशैलीत आणि येथील रहिवाशांच्या तुलनेत कमालीचा फरक आहे. खेड्याचे महानगरात रूपांतर झालेल्या या परिसराचा आमूलाग्र कायापालट झाला आहे.
हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर परिसरात नाइटलाइफचा सद्य:स्थितीतही अनुभव घेता येत असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र कोणतीच दक्षता घेतलेली नाही. शहराच्या अन्य भागांत ११ नंतर कोठेही दुकाने, पानटपऱ्या सुरू असल्याच्या दिसून येत नाहीत. एवढेच नव्हे तर रेल्वेस्थानक, बसथांबे या परिसरातही रात्री दुकाने सुरू नसतात. वाकड, हिंजवडी आणि पिंपळे सौदागर हा परिसर मात्र त्यास अपवाद राहिला आहे. या भागात गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही अधिक आहे.

Web Title: Nightlife trips in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.