पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन
By Admin | Updated: September 17, 2014 18:43 IST2014-09-17T02:22:29+5:302014-09-17T18:43:52+5:30
राजकीयदृष्टया महत्वपूर्ण ठरणा:या पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन
कोल्हापुर: राजकीयदृष्टया महत्वपूर्ण ठरणा:या पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला. कोल्हापुरात आयोजित केलेल्या शुभारंभी प्रचार सभेला प्रचंड गर्दी जमवून आपली ताकद दाखवून दिली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर सडकून टीका करतानाच आपले हुकमी बहुजनवादी कार्ड बाहेर काढले.
राष्ट्रवादीच्या प्रचार सभेसाठी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री शशिकांत शिंदे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सभेचे नेटके नियोजन केले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेऊन चांगलीच वातावरण निर्मिती केली.
छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना-भाजपचे नेते जागावाटपावरून एकमेकांना नवराबायकोची उपमा देवू लागले आहेत. उद्या 144-144 असे जागावाटप झाले तर नवरा कोण व बायको कोण होणार? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली, परंतु त्याचा अहवाल अजून का प्रसिध्द केला जात नाही. भाजपच्या कार्यकारिणीत सहस्त्रबुध्दे, महाजन येतात मग त्यामध्ये पाशा पटेल, फुंडकर का चालत नाहीत. ओबीसी समाजाचे काम करणा:या नेत्यांना श्रीमंत देवेंद्र फडणवीस हे जर नौटंकी म्हणत असतील, तर मग मुंडे हे देखील नौटंकी करत होते असे त्यांना म्हणायचे आहे का, अशी विचारणाही भुजबळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्यास शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल रद्द करून दाखवू अशी घोषणा केली. तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दम असेल तर शिवसेनेने भाजपाची संगत सोडून दाखवावी असे आव्हान दिले. गावित-पाचपुते- घोरपडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा:या भाजपाने त्यांच्यावर कोणते तीर्थ शिंपडल्याने ते पवित्र झाले, असा सवालही त्यांनी केला.
शेट्टी, खासदारकीवर लाथ मारा
तीन महिन्यात केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराने शेतकरी देशोधडीला लागला असताना ‘स्वाभिमानी’ नेते कोठे आहेत, असा सवाल करत राजू शेट्टी यांना शेतक:यांचा जरा कळवळा असेल तर त्यांनी खासदारकी वर लाथ मारावी व बिहारमध्ये जाऊन कृषी मंत्र्याच्या दारात बसावे. गृहमंत्री म्हणून काम करत असताना ऊस आंदोलनामुळे एकही दिवाळी सुखाने खाऊ दिली नाही. बारामती ही आंदोलनाची पंढरी करणा:यांना कांद्याची निर्यात बंदी दिसत नाही का, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला.
‘त्यांना’ काय वाटत असेल
शिवसेनेची भाजपच्या मागे फरफटत चाललेली पाहून स्वर्गीय बाळासाहेबांना वाईट वाटत असेल. उध्दव ठाकरे भाजपा गेली उडत, असे म्हणण्याची हिंमत दाखविणार का, असा सवालही आर.आर. पाटील यांनी केला.
धाकल्या पवारांचा
कक्ष ओस पडला
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शरद पवारांसह एका हॉटेलवर उतरले होते. सकाळपासून थोरल्या पवार यांना भेटणा:यांची संख्या अधिक होती. धाकल्या पवारांचा कक्ष ओस पडला होता.
रणशिंग फुंकले
राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे सभास्थळी तुतारीची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.