भोर : भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले. सह्याद्री मंगल कार्यालय येथे पदवीधर नाव नोंदणी आढावा,जिल्हा परिषद,पंचायत समिती व भोर नगरपालिका निवडणुकीसाठी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी मांडेकर बोलत होते.
प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, यशवंत डाळ, प्रवीण जगदाळे, सुनील भेलके, प्रकाश तनपुरे, विशाल कोंडे, संदीप शेटे, अशोक शिवतरे, केदार देशपांडे, अनुप धोत्रे, सोमनाथ ढवळे, गणेश निगडे, मनीषा कंक, अंकुश कंक, राजेंद्र सोनवणे, कुणाल धुमाळ, अतुल काकडे, मनोज खोपडे, राजन घोडेस्वार, अविनाश गायकवाड बी. डी. गायकवाड, राजेश बोडके उपस्थित होते.
रणजित शिवतरे म्हणाले, पालकमंत्री अजित पवार यांनी या सहा-सात महिन्यांच्या काळामध्ये जवळपास तीन ते चार हजार कोटी रुपयांचा विकास निधी आमदार मांडेकरांच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे घड्याळ हाच उमेदवार समजून काम करावे.
चंद्रकांत बाठे म्हणाले, भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल आणि जिल्हा परिषदेचे चारही उमेदवार विजयी होतील. विक्रम खुटवड म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची प्रारूप मतदारसंघाची रचना जाहीर झाली. त्यावेळी माझ्या गटातील गावे बदलली, ही गोष्ट कशी घडली, कुणी घडवली हे सर्वांना माहीत आहे. मात्र, पक्ष माझ्या पाठीशी मागे उभा राहिला नाही, याची मला खंत आहे. मी इतर कोणत्याही इतर पक्षांत जाणार नाही, माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवला जातोय, तो खपवून घेणार नाही.
प्रदीप गारटकर म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. अनेकजण इच्छुक असल्याने पक्षात काही मतभेद होतात. मनभेद नसतात, त्यामुळे भविष्यात त्या दुरुस्त करता येतील.