भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी
By Admin | Updated: November 16, 2016 02:31 IST2016-11-16T02:31:56+5:302016-11-16T02:31:56+5:30
पिंपळेगुरव, नवी सांगवी, वैदूवस्ती या तीन प्रभागांचा मिळून प्रभाग क्रमांक एकतीस तयार झाला आहे. त्यातील एक जागा अनुसुचित जातींसाठी

भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी
पिंपरी : पिंपळेगुरव, नवी सांगवी, वैदूवस्ती या तीन प्रभागांचा मिळून प्रभाग क्रमांक एकतीस तयार झाला आहे. त्यातील एक जागा अनुसुचित जातींसाठी, एक जागा ओबीसी महिला गटासाठी, एक जागा सर्वसाधारण महिला गटासाठी आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत. मध्यमवर्गीय, कामगार असा संमिश्र मतदार या प्रभागात आहे. प्रभागाची रचना आयताकृती झाली आहे. या प्रभागात कामगारांचे मत निर्णायक ठरणार आहे. भाजपाकडून या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची कोडी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक ५६ वैदूवस्ती, प्रभाग क्रमांक ५७ पिंपळेगुरव, प्रभाग क्रमांक ५८ नवी सांगवी या तीन प्रभागांचा मिळून नवीन प्रभाग तयार झाला आहे. लष्करी आणि सीक्यूई हद्दीने हा प्रभाग तोडला गेला आहे.
पिंपळेगुरव मधील महापालिका शाळा, राजीव गांधीनगर हद्दीने वॉटर टँक, लष्करी हद्दीने समर्थ बिल्डिंग, गजानन महाराज नगर हद्दीने, एमके हॉटेल चौक, पुढे औंध हॉस्पिटल परिसरातील हद्दीने किर्तीनगरपर्यंतचा भाग या प्रभागास जोडला आहे. तसेच किर्तीनगर सीक्यूई हद्दीने, नवी सांगवी साई चौक, कृष्णा चौक, ऋतुलाल, ओम साई सदन अपार्टमेंट, बारामती सहकारी बँक, सह्याद्री पार्क रस्ता, हिरंकुश निवास, क्लासिका हाईट, गोपिका निवास, बँक आॅफ महाराष्ट्र चौक, पुढे काशिदनगर हद्दीने शिवगणेश रेसीडेन्सी, पाटील प्लाझा आणि पिंपळेगुरवमधील महापालिका हायस्कुलपर्यंतचा भाग या प्रभागात जोडला आहे. तीन प्रभांगाची मोडतोड केली आहे. नवीसांगवी प्रभागातील किर्तीनगर, वैदूवस्ती प्रभागातील राजीव गांधीनगर तसेच पिंपळेगुरव प्रभागातील काही भागही नवीन प्रभागास जोडला आहे. झोपडपट्टी आणि नव्याने विकसित झालेल्या सोसायट्यांची आणि बैठी घरांची संख्या अधिक आहे. अनधिकृत बांधकामे आणि शास्ती हा प्रमुख प्रश्न आहे. पालिकेच्या गेल्या निवडणूकीत वैदूवस्ती प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास बोकड, वैशाली जवळकर, पिंपळेगुरव प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला धराडे, राजेंद्र जगताप, नवी सांगवी प्रभागातून राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप, शैलजा शितोळे हे निवडूण आले होते. एकुण सहापैकी सहा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. उपलब्ध आरक्षणानुसार सर्वांना संधी आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडूण आलेल्या धराडे, जगताप, शितोळे, नवनाथ जगताप, बोकड आणि जवळकर हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रभागातही सर्वसाधारण पुरूष गटाची एकच जागा असल्याने कोणत्या जागेवरून कोण उभे राहणार? राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक भाजपाकडून लढणार की राष्ट्रवादीकडून लढणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वसाधारण गटासाठी स्थानिकांमध्ये चुरस अनुभवयास मिळणार आहे. साठ हजारांच्या आसपास लोकसंख्या असतानाही या भागातील अंतर्गत रस्ते अरूंद आहेत. या भागात अनियंत्रिपणे बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे गावठाणाच्या परिसरात अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचाही प्रश्न सुटलेला नाही. तसेच आरक्षणांचाही विकास रखडलेला आहे. या प्रभागातील नाट्यगृहांचेही काम अजून अपूर्णावस्थेत आहे. रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या या भागातील प्रमुख प्रश्न आहे. (प्रतिनिधी)