सट्टा लावताना राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक, जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 12:50 IST2017-08-09T12:48:57+5:302017-08-09T12:50:39+5:30
तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

सट्टा लावताना राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक, जामिनावर सुटका
पिंपरी, दि. 9- तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता. मंगळवारी रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींकडून 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जावेद रमजान शेख (वय. 47 रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी), नवीन भगवान मित्तल (वय 43 रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय 37 रा. बालाजीनगर धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36 रा. दत्तवाडी आकुर्डी) जाकीर मस्तान शेख (वय 29 रा. विद्यानगर चिंचवड) अशी करवाई केलेल्या आरोपींची नावं आहेत.
चिखलीच्या मित्तल बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्याचं काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांकडून जुगाराचं साहित्य, लॅपटॉप,मोबाईल, रोख 53 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.